अमरावती : चिखलदरा येथे पावसाळी पर्यटनासाठी आठवडा अखेरीस मोठी गर्दी होते. गेल्या शनिवारी आणि रविवारी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आणि पर्यटकांचे हाल झाले. शनिवार आणि रविवारी दोन मार्गांवर एकमार्गी (वन-वे) वाहतूक व्यवस्था असतानाही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने आता आठवडाअखेरीस तीन दिवस वन-वे ची व्यवस्था लागू केली आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार तसेच अन्य सुटीच्या दिवशी वन-वे वाहतूक राहणार आहे.

चिखलदऱ्याकडे जाताना आणि चिखलदऱ्यावरून परतवाड्याकडे येताना वनवे वाहतूक नियम आता शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी दिले आहेत. या तीन दिवसांसह अन्य सुटीच्या दिवशी देखील परतवाडाहून चिखलदराकडे जाणारी वाहतूक ही धामणगाव गढी मार्गे तर चिखलदराहून परतवाडाकडे जाणारी वाहतूक ही घटांगमार्गे वळवण्यात येणार आहे.

चिखलदरा येथे पर्यटकांच्या सोयीसुविधांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह चिखलदरा आणि धारणीचे तहसीलदार, उपवनसंरक्षक व नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये पर्यटकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापूर्वी शनिवार व रविवार या दोन दिवसांत चिखलदऱ्याला जाणारी वाहतूक आणि चिखलदऱ्यावरून परतवाड्याकडे येणारी वाहतूक ही वन-वे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यात आत बदल करून ही वन-वे वाहतूक आदल्या दिवशीपासूनच म्हणजे शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते पुढील दिवस म्हणजे सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत लागू राहील. यामुळे वाहतूक नियंत्रणास अधिक प्रभावीपणे पार पाडता येईल. वाहतुकीसाठी बनलेले सहा चेक पॉइंट्स शोधण्यात आले असून यामध्ये ५० पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त पुढील काळात चिखलदरा व परिसरामध्ये राहणार आहे. त्यांच्यामार्फत वाहतूक नियंत्रण करण्यात येईल. सोबतच वनविभागाच्या नाक्यावर अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे वनविभागांच्या नाक्यावरील वाहनांच्या लागणाऱ्या रांगा कमी होण्यास मदत होईल.

जास्त दराने वस्तू विकल्यास कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यटकांना गरजेचे असलेल्या पाण्याच्या बाटल्या व इतर खाद्यपदार्थ निर्धारित दरापेक्षा जास्त दराने विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत सर्व आस्थापनांना सूचना देण्यात आल्या. ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी दिला आहे.