बहुचर्चित आशीष बुधबावरे हत्याकांडातील तिन्ही आरोपींना नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.संजय मधुकर वाघाडे (४०, रा. चुनाभट्टी), राकेश पाली (रा.पार्वतीनगर) आणि विक्की चंदेल, अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आशीष रामाजी बुधबावरे (२८) असे मृताचे नाव आहे. आशीष बुधबावरेविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत, तर आरोपींचीही गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे. मृत आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. गुन्हेगारी जगतातील व्यवहारांमधून आशीष आणि आरोपींमध्ये वैमनस्य होते. १ मार्च २०१३ च्या मध्यरात्री आशीष, त्याचा भाऊ अमित आणि आरोपी हे कैकाडीनगर येथे देशी दारूच्या अड्डय़ावर दारू पिण्यासाठी गेले होते. त्यानंतर जुन्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद करतच ते अजनी पुलावर पोहोचले. तेथे आरोपींनी आशीष आणि त्याच्या भावावर शस्त्राने हल्ला केला. यात आशीष हा धारातिर्थीच कोसळला, तर अमित जीव वाचविण्यासाठी पळाला, परंतु आरोपींनी अमितचा पाठलाग केला आणि त्याला अजित बेकरीसमोर गाठले. त्या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केला. तो गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपी पळून गेले. यात आशीषचा मृत्यू झाला, तर अमितवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेडिकल) उपचार करण्यात आले. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. मृत आणि आरोपी हे गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असल्याने शहरात या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. या प्रकरणाचा खटला न्या. शेखर मुनघाटे यांच्यासमोर चालला. सरकारतर्फे सरकारी वकील दीपक कोल्हे आणि आरोपींच्या वतीने अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे, अ‍ॅड. अशोक भांगडे आणि अ‍ॅड. राम मासुरकर यांनी बाजू मांडली. सर्व साक्षीपुरावे तपासल्यावर न्यायालयाने सर्व आरोपींना खुनाच्या कलमाखाली दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.