चंद्रपूर:वन विकास महामंडळाच्या खडसंगी रेंज मधील भिसी क्षेत्रातील महालगावं बीट नंबर २१ मधे सात महिन्याच्या एका मादी वाघाच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन वाघाच्या झुंजीत वाघाच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोमवार १९ मे रोजी रात्री उशिरा वाघाच्या मृत्यूची माहिती समोर आली. त्यानंतर मंगळवार २० मे रोजी प्राणी उपचार केंद्र चंद्रपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले.
मृताचे सर्व नखे, मिश्या, दाते शाबूत आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या मानेच्या मणका फ्रॅक्चर झाले आहेत. तिसऱ्या डाव्या बरगडी तसेच उजव्या पाचव्या आणि सहाव्या बरगडीमध्ये फ्रॅक्चर आहे व गंभीर रक्तस्त्राव झाला आहे. शवविच्छेदन नुसार प्राथमिक अंदाज -सदर वाघाच्या मादी पिल्लाचा मृत्यू दोन वाघाच्या झुंझीत अति रक्तस्राव मुळे झाला आहे.
शवविच्छेदन दरम्यान हिस्टोपॅथॉलॉजिकल आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी नमुने गोळा करण्यात आले आहेत. शवविच्छेदन पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) तथा जलद बचाव गट ,प्रमुख ,ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प डॉ. रविकांत खोब्रागडे , डॉ.कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी ,TTC,चंद्रपूर,डॉ.कडूकर ,चंद्रपूर यांनी केले.