भंडारा : शंकरपट पाहून घराकडे परत जाणाऱ्या एका तरुणाला बाजारात वाघ मुक्तसंचार करताना दिसला. वाघ दिसताच त्याने ताबडतोब गावकऱ्यांपर्यत वाघ गावात फिरत असल्याचा संदेश पोहचवला. त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आणि सर्वत्र पळापळ सुरू झाली.

जंगलाने वेढलेल्या तुमसर तालुक्यातील आलेसुर गावात एक वाघ चक्क गावाच्या बाजारपेठ चौकात मुक्तसंचार करताना दिसल्याने खळबळ उडाली. ही घटना रात्री ९:३० ते १० वाजताच्या दरम्यान घडली. शंकरपट पाहून घरी परतणाऱ्या रमेश मेहरने बाजारात वाघ पहिला. त्याने ताबडतोब गावात याची माहिती दिली, ज्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

शंकरपट पाहून झाल्यावर रमेश मेहर आपल्या गावी परत जात असताना त्याला बाजार चौकात एक वाघ फिरताना दिसला. सुरुवातीला त्याच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही, पण जेव्हा त्याला स्पष्ट वाघ दिसला तेव्हा त्याने वेळ न घालवता गावाकडे धाव घेतली आणि गावकऱ्यांना वाघ फिरत असल्याची माहिती दिली. यानंतर गावात गोंधळ उडाला. तरुणांनी मोबाईलवरून एकमेकांना माहिती दिली आणि “वाघ आला आहे… पळा, पळा” असा संदेश सर्वत्र व्हायरल झाला.

आलेसुर हे सुमारे १३०० लोकसंख्येचे सातपुडा पर्वतरांगेत वसलेले गाव आहे. हे गाव लेंडेझारी वनक्षेत्रात येते आणि घनदाट जंगलाने वेढलेले आहे. हा परिसर वन्यजीवांच्या मुक्त संचारासाठी ओळखला जातो. जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले आहेत, त्यामुळे वाघ पाण्याच्या किंवा भक्ष्याच्या शोधात गावात आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. जरी तो नंतर जंगलाकडे परत गेला, तरी तो गावाजवळ कुठेतरी तळ ठोकत असावा हे नाकारता येत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेंदूपत्ता संकलनावर परिणाम: या प्रकारा नंतर आलेसुर आणि आजूबाजूच्या १०-१२ गावांमधील सुमारे ७००-८०० ग्रामस्थ तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेले नाहीत. उन्हाळ्यात, गावकरी तेंदूची पाने गोळा करून ५०० रुपयांपर्यंत कमाई करतात, परंतु वाघाच्या भीतीमुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे.