नागपूर : महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पातील ‘टी-४१’ या वाघिणीच्या गळ्यातील सापळा काढण्यात आला असून वाघीणीला कोणतीही दुखापत आढळली नाही.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील नियमित कॅमेरा ट्रॅप छायाचित्रांच्या तपासणीदरम्यान २६ जानेवारीला अंदाजे पाच वर्षांच्या ‘टी-४१’ वाघिणीच्या गळ्यात सापळा दिसला. पेंच व्याघ्रप्रकल्पातील नागलवाडी वनक्षेत्रातील मायकेपार बीटच्या जंगलात ही वाघीण आढळली. लगतच्या गावाच्या भागापासून हे अंतर अंदाजे एक किलोमीटर होते. वाघिणीच्या निगराणीसाठी सुमारे ६० कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आले होते. त्यात नियमित वन कर्मचारी, विशेष व्याघ्र संरक्षण दल आणि संरक्षण कामगार यांचा समावेश असलेली ११ पथके तैनात करण्यात आली होती. वाघिणींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच गावकऱ्यांना सतर्कतेचे संदेश देण्यासाठी ईडीसी सदस्य, पोलीस पाटील आणि लगतच्या गावांचे सरपंच यांचा व्हॉट्सअप समूह तयार करण्यात आला. २०२१ च्या चौथ्या टप्प्यातील निरीक्षण अहवालानुसार, वाघिणीची श्रेणी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी, सालेघाट आणि पश्चिम पेंच पर्वतरांगांमध्ये पसरली होती. ज्यात अंदाजे ४० कक्ष आणि ११० चौरस किमी पेक्षा जास्त क्षेत्र होते. सातत्याने ती लांबचे अंतर पार करत होती. येथे एक नर वाघ ‘टी-४१’ सोबत फिरत असल्याचेही आढळून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१७ फेब्रुवारीला कॅमेरा ट्रॅपच्या छायाचित्रांतून वाघिणीची सापळ्यातून सुटका झाल्याचे समोर आले. मात्र, वाघिणीच्या मानेवर जखमा असल्याने निगराणी पथकाने तिच्यावर बारीक नजर ठेवली. १६ एप्रिलच्या कॅमेरा ट्रॅप छायाचित्रात तिच्या मानेवरील जखमा बऱ्या झाल्याचे आणि वाघीण निरोगी असल्याचे दिसून आले. या संपूर्ण मोहीमेत निरीक्षण चमूने केलेली एकूण गस्त १५०० किलामीटरपेक्षा जास्त होती. निरीक्षण चमूमध्ये सहाय्यक वनसंरक्षक किरण पाटील, सहाय्यक वनसंरक्षक अनिल परब, सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय सुर्यवंशी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड, ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राची चमू तसेच विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.