पंधरा दिवसांत तोडगा काढण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

नागपूर : महापालिकेने त्यांच्या दुकानांच्या भाडेपट्टीत वाढ केली आहे. या वाढीला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. व्यापाऱ्यांचा हा विरोध लक्षात घेता यावर पंधरा दिवसात तोडगा काढण्याचे  निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना दिले आहेत.

राऊत यांनी सोमवारी महापालिका क्षेत्रातील विविध विषयांवरील बैठका जिल्हाधिकारी कार्यालयात घेतल्या. यावेळी महाालिका आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीणा, राम जोशी यांच्यासह विविध विभागांचे  प्रमुख उपस्थित होते.

शहरातील महापालिकेच्या मालकीचे अनेक गाळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून व्यापाऱ्यांना भाडेपट्टीवर दिले आहेत. त्यात महापालिकेने वाढ केली असून त्यासाठी बाजारमूल्याचा आधार घेतला आहे. मात्र त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. व्यापाऱ्यांची संघटना एन.एम.सी. मार्केट फेडरेशनने बैठकीमध्ये आपल्या समस्या मांडल्या. महापालिकेने केलेली भाडेवाढ आणि व्यापाऱ्यांच्या समस्या यात सुवर्णमध्य साधून तोडगा काढा, असे निर्देश राऊत यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरही यावेळी चर्चा झाली. कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वीच करण्यात आले. तसेच महागाई भत्ता देण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या उत्पन्नात वाढ कशी होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.

कोराडीत ऊर्जा शिक्षण पार्क

कोराडी औष्णिक केंद्राच्या परिसरात वीज निर्मितीची माहिती देणारा ‘ऊर्जा शिक्षण पार्क’  साकारण्यात येणार आहे. यासाठी १२५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या बाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना दिले. प्रन्यासच्या कार्यालयात कोराडी ऊर्जा शिक्षण पार्क प्रकल्प निर्मिती संदर्भात आढावा बैठक राऊत यांनी घेतली. यावेळी नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, वास्तूविशारद अशोक मोखा, कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

पाणी पुरवठय़ाबाबत तक्रारी

मागील आठवडय़ात नागपुरातील अनेक भागांतील जलकुंभांचे पालकमंत्री  डॉ. राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. मात्र त्यापैकी काही भागांमध्ये पाणीपुरवठा संदर्भात तक्रारी आहेत. तसेच काही ठिकाणी गळती सुरू झाली आहे. याबाबत राऊत यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. पुढील आठवडय़ात तक्रारी दूर केल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.