नागपूर: गोर- गरीब जनतेला माफक दरात धार्मिक पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी एसटी महामंडळासोबत सोबत राज्यातील खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहन खात्याने केले आहे. त्याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करव्यात जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येईल. या योजनेत राज्यातील सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते.
याप्रसंगी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर,सर्व खाते प्रमुख यांच्या सह खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील गोर- गरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या माध्यमातून कमी गर्दीच्या दिवसात सहलीचे आयोजन करावे. यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर तीर्थर्क्षेत्राच्या ठिकाणी भाविक पर्यटकांना स्वच्छतागृह व निवास व्यवस्था (जिथे उपलब्ध असेल तिथे) निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल. कमी गर्दीच्या हंगामामध्ये विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी एसटीला प्रवासी भारमान कमी असते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळते.
अशावेळी एसटीने खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी धार्मिक पर्यटन स्थळी सहली आयोजित केल्यास त्यातून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल, तसेच सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात पर्यटनचा आनंद लुटता येईल. त्या अनुषंगाने खाजगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कमी गर्दीच्या दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन , तुळजापूर- पंढरपूर -अक्कलकोट दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, त्रंबकेश्वर -नाशिक दर्शन अशा धार्मिक सहलींचे आयोजन करावे. तथापि,या उपक्रमाची सुरुवात येत्या श्रावण महिन्यापासून करण्यात यावी अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला बैठकीत दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्सल आणि एसटी महामंडळ सोबत काम करणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्सलकडून खासगी ट्रॅव्हल्सच्या मदतीने विविध सहलीचे आयोजन केले जाते. त्यात राहण्यासाठी हॉटेलचीही सोय असते. परंतु त्याचे दर तुलनेत महाग असतात.