नागपूर : राज्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहतूक पोलिसांनी २०१९ पासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून ई-चालान करणे सुरू केले. आतापर्यंत ७ कोटी ५३ लाखांपेक्षा जास्त वाहनचालकांवर ३ हजार ६६७ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, त्यापैकी २ हजार ४२९ कोटी रुपयांचा दंड अद्यापही थकीत आहे. गेल्या पाच वर्षांत आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या केवळ ३५ टक्केच रक्कम वसूल झाल्याची माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ई-चालान पाठवण्यात येते. तसेच आता वाहतूक पोलिसांकडे असलेल्या ‘पॉस मशीन’च्या माध्यमातूनही ई-चालान करण्यात येते. त्यानुसार, राज्यात गेल्या पाच वर्षांत ७ कोटी ५३ लाख वाहनचालकांना ई-चालान बजावण्यात आले. या चालानच्या दंडाची रक्कम ३ हजार ६६७ कोटी रुपये एवढी आहे. काहींनी स्वयंस्फूर्तीने १ हजार ३३९ कोटी रुपये भरले आहे. परंतु, ही रक्कम केवळ ३५ टक्केच आहे. २ हजार ४२९ कोटींचा दंड अद्याप थकीत आहे.

आणखी वाचा-पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…

कर्नाटक सरकारकडून ५० टक्के दंड माफ

वाहतूक पोलिसांनी ठोठावलेल्या दंडाची रक्कम दिवसेंदिवस वाढत होती. परंतु, दंड भरणाऱ्यांची संख्या वाढत नव्हती. त्यामुळे कर्नाटक सरकारने लोकअदालतमध्ये दंड भरल्यास वाहतूक दंडाची ५० टक्के रक्कम माफ करण्याची घोषणा केली. त्यामुळे कर्नाटकात दंडाच्या वसुलीचे प्रमाण चौपट वाढले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुक्त म्हणतात…

नागपूर वाहतूक पोलिसांनी दंड वसूल करण्यासाठी विशेष अभियोजन कक्षाची स्थापना केली आहे. दंड वसूल करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. या कक्षाच्या माध्यमातून दंड वसूल होत आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी सांगितले.