यवतमाळ : राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची कन्या ॲड. प्रियदर्शनी उईके यांनी भाजपकडून आज शनिवारी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले. त्यामुळे यवतमाळात नगरपालिकेत भाजप स्वबळावर लढणार हे स्पष्ट झाले. मात्र यामुळे महायुतीत बेबनाव असल्याचे समोर आले आहे.
नगर पालिका निवडणुकीत यवतमाळ, उमरखेड, पुसद व वणी पालिकेत महाविकास आघाडीचे सूत जुळले आहे. सत्ताधारी महायुतीत मात्र भाजपने स्वबळाची तयारी सुरू केली असून तिरंगी लढतीचे चित्र आहे. जिल्ह्यात १० नगर पालिका व एका नगरपंचायतीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अखेरचे काही तास शिल्लक राहिले आहे. असे असताना सत्ताधारी पक्षात युतीची चर्चा थांबली आहे. यवतमाळ नगर पालिकेत शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाची युती झाली आहे. भाजपने अद्याप युतीबद्दल निर्णय जाहीर केला नाही. पुसद पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तसेच भाजपची युती निश्चित मानली जात आहे. इतर पालिकेत सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. पुसद आणि यवतमाळ पालिकेत सत्ताधारी पक्षातील दोन पक्षाची युती झाली असली तरी अनेक पालिकेत स्वबळावरच निवडणूक लढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे १० पैकी चार पालिकेत महाविकास आघाडी झाली आहे. त्याठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झाले असून नामाकंन दाखल झाले आहे. महायुतीत जागावाटपावरून ओढताण असल्याने युती फिस्कटल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
यवतमाळ पालिका नगराध्यक्षपदासाठी माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी नामाकंन दाखल केले आहे. त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या प्रकरणात तांत्रिक अडचण येण्याची शक्यता आहे. माधुरी मडावी रिंगणात कायम राहिल्यास यवतमाळ पालिकेत नगराध्यक्ष पदासाठी अत्यंत चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे.
अनेक माजी सदस्यांना डच्चू
यवतमाळ पालिका उमेदवारीसाठी भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा वाढली आहे. प्रभागाचा पुर्नरचनेमुळे आणखी घोळ वाढला आहे. यामुळेच आता अनेक माजी सदस्यांचा उमेदवारीतून पत्ता कट झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
