बुलढाणा: स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास बुलढाणा न्यायालयाने आज, शनिवारी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात फिर्यादी आईसह साक्षीदार असलेले नातलग फितूर झाले असतानाही गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीला कठोर शिक्षा मिळाली, हे विशेष.

बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग १) आर. एन. मेहेर यांनी आरोपी व फितुरी करणाऱ्यांना जरब बसविणारा हा निकाल दिला. रायपूर (ता. बुलढाणा) येथील रहिवासी गजानन सुखदेव वैदय याने तिच्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. मागील १० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री राहत्या घरी ही घटना घडली. यावेळी गजानन याने पीडिता व तिच्या आईला वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून पुरावे गोळा केले. याप्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली. रायपूर पोलिसांनी आरोपी गजानन विरुद्ध भादवी कलम ३२३, ३७६(२)(एफ)(जे), ३७६( ३), ५०६ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४,६,८,१०, १२ नुसार गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>>उमेदवारांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार, वनमंत्री मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय

पीडितेसह नातलग फितूर!

हा खटला सुनावणीसाठी न्यायाधीश मेहेर यांच्या समक्ष आला. खटल्यात सरकारतर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र पीडिता, तिची आई, बहीण, भाऊ, दोन्ही आजी व आरोपीचा भाऊ हे फितूर झाले. त्यांनी सरकार पक्षाला मदत केली नाही. मात्र गुन्हा सिद्ध झाला. जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मण  भटकर यांनी प्रभावी युक्तिवाद करीत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायाधीश आर. एन. मेहेर यांनी नराधम पित्यास २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पैरवी हवालदार बाबुसिंग  बारवाल यांनी खटल्यात सहकार्य केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फितूर आईला नोटीस

या खटल्यात फिर्यादी आईने फितुरी केली. यामुळे न्यायाधीशानी ‘सीआरपीसी’च्या कलम ३४४ नुसार कारवाई केली असून तिला नोटीस बजावली आहे. तसेच पीडितेला मदतीसाठी निकाल जिल्हा विधि सेवा प्राधिकरण कडे वर्ग केले आहे.