जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी नागरिक तेथे गर्दी करीत आहे. वरोरा व शेगाव येथील काही युवक चारगाव धरणावर पर्यटनासाठी गेले होते. यादरम्यान भ्रमणध्वनीवर ‘सेल्फी’ घेण्याच्या मोहात दोन तरुण धरणाच्या पाण्यात वाहून गेले. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. हार्दिक विनायक गुळघाणे (१९, रा. शेगाव) तर आयुष चिडे (१९, रा. वरोरा) असे वाहून गेलेल्या युवकांची नावे आहेत.
हेही वाचा – वर्धा : घरकुलाच्या नावाखाली श्रमिकांची फसवणूक
हार्दिक गुळघाणे, वरोरा येथील आयुष चिडे, श्वेतम जयस्वाल, मयूर विजय पारखी आणि आश्रय संजू गोळगोडे हे पाच मित्र चारगाव धरण पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान, सेल्फी घेत असताना हार्दिकचा पाय घसरला व तो तलावात पडला. त्याला वाचवण्यासाठी आयुष चिडेने पाण्यात उडी घेतली. मात्र, आयुषही पाण्यात बुडाला. हे पाहून इतर मित्रांनी आरडाओरड केली. स्थानिक नागरिकांनी हार्दिक आणि आयुषला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने बचाव पथकाला चारगाव येथे पाठविले असून त्यांनी दोघांचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास शेगाव पोलीस करीत आहे.