नागपूर: देशात सातत्याने बेरोजगारी वाढत असून तरुणांच्या हाताला काम नाही, अशी टिका सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांकडून केली जाते. यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने प्रत्येक वर्षी २ कोटी तरुणांना रोजगाराच्या दिलेला आश्वासनाची आठवण करत भाजप सरकारची खिल्लीही उडवली जाते. दरम्यान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशात २२ लाख तरुणांना कशा पद्धतीने रोजगाराची संधी आहे, त्याबाबत भाष्य केले आहे.

नागपुरातील आदिवासी विभागातर्फे शनिवारी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरणावर एक कार्यक्रम सुरेश भट सभागृहात संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. केंद्र सरकारची ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलबाबतची एक महत्वाकांक्षी योजना आहे. प्रत्येक ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरसाठी सरकारच ३ ते ४ कोटी रुपयांपर्यंत अनुदान देते. दरम्यान राज्यात २५ ते ३० केंद्र तर देशात २५० च्या जवळपास केंद्र सध्या तयार झाले आहे. परंतु देशभरात ४ हजार केंद्राची गरज आहे. त्यासाठीच्या प्रकल्पावर विविध स्तरावर कामही सुरू आहे. त्यासाठी केंद्र सरकारने नियम व निकष निश्चित केले आहे.

दरम्यान सध्या या निकषानुसार राज्यासह देशात हे केंद्र उघडण्यासाठी आरटीओला मध्यस्ती म्हणून निश्चित केले गेले आहे. तुम्ही (आदिवासी खाते) म्हणत असल्यास आरटीओच्या एवजी आदिवासी खात्याचे नावही मध्यस्ती म्हणून करायला मी तयार आहे. आदिवासी खात्याने पुढाकार घेत ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलचे केंद्र देवलापारसह राज्यातील इतरही आदिवासी बहूल भागात केल्यास तेथील आदिवासी तरुण मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षीत होऊन त्यांना प्रशिक्षीत वाहन चालक म्हणून रोजगार मिळू शकेल. सध्या देशात तब्बल २२ लाख प्रशिक्षीत वाहन चालकांची गरज आहे. त्यामुळे या पद्धतीने तब्बल २२ लाख लोकांना रोजगाराची चांगली संधी असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

आदिवासींनी उच्च शिक्षण घ्यावे-

आदिवासी समाजातील मुला- मुलींनी शिक्षणासह ज्ञानाचे महत्व समजायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही शिक्षण हे वाघिणीचे दूध असल्याचे म्हटले आहे. शिक्षण, ज्ञानाच्या जोरावर आदिवासी मुले- मुली चांगले नागरिक होऊन त्यांना रोजगार मिळणे शक्य आहे. त्यासाठी आदिवासी खात्याने या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करायला हवे. त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिल्यास त्यातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणे शक्य आहे, असेही गडकरी म्हणाले.

राणी दुर्गावती महिलांसाठी आदर्श

चांगल्या राज्यकर्त्यांच्या यादीत राणी दुर्गावती यांचे नाव कोरल्या गेले आहे. आदिवासींना  त्यांचा इतिहास परिचित आहे. राणी दुर्गावती यांनी आपले नेतृत्व, समाजाचे केलेले रक्षण, समाजाला दिलेली दिशा ही सगळ्यांना प्रेरणा देणारी आहे. प्रत्येकाने ती आत्मसात केल्यास ते चांगले नागरिक होऊ शकतात, असेही नितीन गडकरी म्हणाले.