उन्हाळी परीक्षांचे नियोजन सुरू

नागपूर : करोनामुळे दोन वर्षांपासून सुरू असलेल्या ऑनलाईन परीक्षेने खालावलेला परीक्षेचा दर्जा सुधारण्यासाठी अखेर आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.  ऑफलाईन परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांचा चांगलाच कस लागणार आहे.  करोनामुळे मागील दोन वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्राचे वेळापत्रक बिघडले होते. करोनामुळे ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याने अनेक वादानंतरही सर्व परीक्षा या ऑनलाईन घेण्यात आल्या. मात्र, ऑनलाईन परीक्षेमध्ये विद्यापीठाच्या परीक्षेची गुणवत्ता घसरल्याने या परीक्षांना विरोधही होत होता. दोन वर्षे सुरू असलेल्या ऑनलाईन परीक्षेने विद्यापीठाच्या निकालातही चांगलीच वाढ दिसून आली. दोन ते चार सत्रांमध्येही उत्तीर्ण होऊ न शकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेच्या भरवश्यावर पदवी उत्तीर्ण केली. त्यामुळे परीक्षेची गुणवत्ता खालावल्याने सर्व परीक्षा आता ऑफलाईन घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

या परीक्षांची तयारी विद्यापीठाने सुरू केली  आहे. विद्यापीठाने यावर्षीपासून परीक्षेसाठी ५०-५० चे सूत्र लागू केले आहे. यानुसार सम सत्राच्या परीक्षा विद्यापीठ तर विषम सत्राच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर होणार आहेत. त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम वर्षांच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा महाविद्यालयांना स्थानिक स्तरावर सुरू आहेत. या परीक्षांना अनेक अडचणी असल्याने उशिरा सुरू झाल्या. सम-विषम परीक्षेच्या सूत्रानुसार सर्व सम सत्राच्या परीक्षा या उन्हाळी सत्रामध्ये येत असल्याने त्यांची जबाबदारी विद्यापीठावर राहणार आहे. त्यामुळे यंदा होणारी उन्हाळी परीक्षा उशिरारच सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून परीक्षा?

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उन्हाळी परीक्षांच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. त्यानुसार आता उन्हाळी परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असल्याने त्यांच्या परीक्षा आधी घेण्याचा निर्णयही विद्यापीठाच्या विचाराधीन आहे.

विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेचे नियोजन सुरू असून लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग.