अमरावती : आपल्या सूर्यमालेतील सातव्या क्रमांकाचा ग्रह युरेनस हा २१ नाव्हेंबर रोजी अगदी सूर्यासमोर राहील. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियूती (अपोझीशन) असे म्हणतात. प्रतियूती काळात पृथ्वीपासून ग्रहाचे अंतर सरासरी कमी असते. त्यामुळे अशा काळात ग्रहाचे पृथ्वीवरुन निरीक्षण अगदी चांगल्या प्रकारे करता येते.
दुर्बिनीच्या सहाय्याने शोधलेला पहिला ग्रह म्हणजे युरेनस हा होय. या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास ८४ वर्ष लागतात. तो स्वतःभोवती एक चक्कर १७.२४ तासात पूर्ण करतो. विल्यम हर्षेल याने १३ मार्च १७८१ रोजी हा ग्रह शोधला. या ग्रहाला २७ उपग्रह व शनिप्रमाणे कडा सूद्धा आहे. हा ग्रह साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही.
युरेनसच्या उपग्रहाची नावे ही शेक्सपियरच्या नाटकातील पात्रांची आहे. युरेनसच्या प्रमुख उपग्रहाची नावे- कार्डेलिया, ऑफेलिया, बियांका, क्रेसिडा, ज्युलियेट व पोर्शिया अशी आहेत. सूर्यापासून युरेनसचे अंतर २८८ कोटी कि.मी. आहे.
हा ग्रह जवळ येत असल्याने या ग्रहाचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. हा ग्रह २१ नोव्हेंबर या दिवशी पूर्व दिशेला उगवेल व पहाटे पश्चिमेकडे मावळेल. हा ग्रह साध्या डोळ्यांनी दिसू शकणार नाही. यासाठी ‘हाय रेंज टेलिस्कोप’ची आवश्यकता आहे. याआधी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी या ग्रहाची प्रतीयुती झाली होती, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने आणि हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर यांनी दिली.
आपल्याला पृथ्वीवरून बुध ते शनीपर्यंतचे ग्रह डोळयानी दिसत असल्याने अगदी १८ व्या शतकापर्यंत सौरमालेत सहाच ग्रह आहेत असे वाटत होते. १७८१ मध्ये ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेल दुर्बिणीतून ताऱ्यांचे निरीक्षण करत असताना १३ मार्च रोजी वृषभ व मिथुन या तारकासमूहांच्या सीमेवर त्यांना एक निळसर हिरवट रंगाचा ‘ठिपका’ दिसला. तो धूमकेतू असावा असे त्यांना वाटले खरे. पण सतत निरीक्षण केल्यानंतर हा शनीपलीकडचा सातवा ग्रह आहे हे त्यांनी जाहीर केले. सुरुवातीला हा नवा ग्रह त्यांच्या नावाने हर्षेल म्हणून ओळखला जाऊ लागला, पण ग्रहांना ग्रीक देवतांची नावे देण्याच्या संकेताला धरून पुढे त्याला आकाशाची देवता युरेनसचे नाव देण्यात आले. युरेनस आणि नेपच्यून साधारण सारख्याच आकाराची दूरवरची भावंडे आहेत. सूर्यापासून सरासरी २.८७ अब्ज किमी असणाऱ्या युरेनसला सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला ८४.०१ वर्षे लागतात.
