दहन ओटय़ावर खड्डे, रस्ते उखडले, परिसरात घाण

दहन ओटे तुटलेले, बसण्याच्या जागेवर कचऱ्याचे साम्राज्य.. परिसरात वाढलेली झुडपे.. विद्युत दाहिनीकडे जाणाऱ्या मार्गावर साचलेला कचरा.. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची वानवा.. टँकमध्ये कचरा आणि परिसरात अस्वच्छता.. गोवऱ्यांचा तुटवडा.. तुटलेला विसावा ओटा.. अशा एक नव्हे तर अनेक समस्या उत्तर नागपुरातील वैशालीनगर घाटावर आहेत.

उत्तर नागपुरात दीड एकर परिसरातील वैशालीनगर दहनघाटावर विकाससाठी आमदार निधी आणि महापालिकेने लाखो रुपये खर्च केले. तरीही दहनघाटाची अवस्था दयनीय अशी आहे. घाटामध्ये प्रवेश करण्याच्या रस्त्याची दुर्दशा झाली. सिमेंटीकरण, टाईल्स उखडले आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, घाटाचे सौंदर्यीकरणावर झालेला पाच लाखाचा खर्च व्यर्थ ठरला असून सध्या परिसरात झुडपे वाढली आहेत. सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे.

अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना बसण्यासाठी व्यवस्था असली तरी त्या ठिकाणी कचरा असतो. सफाई कर्मचारी हजर नसतो. परिसरातील प्रतिष्ठित कुटुंबातील शवयात्रा असेल तर घाट सफाई होते. अन्यथा दुर्लक्ष केले जाते. पाण्याची टाकी सहा महिन्यापासून स्वच्छ करण्यात आली नाही. हातपंप आहे मात्र टाकीतील पाणी संपले की पाणी येत नाही. सार्वजनिक नळ सकाळी ११ वाजेपर्यंत असतो, त्यानंतर टाकीला पाणीपुरवठा होत नाही. घाटाच्या मागच्या भागातील पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे परिसरात घाण पाणी येत असल्याने दरुगधी पसरलेली असते.

विद्युत दाहिनीकडे दुर्लक्ष

घाटावर विद्युत दाहिनीची व्यवस्था आहे. मात्र, त्यासााठी ना दरवाजा ना खिडक्यांना तावदाने आहेत. आजूबाजूला झाडे वाढलेली असून रस्ता सुद्धा उखडलेला आहे. त्यामुळे अनेक लोक विद्युत दाहिनीचा वापर करीत नाही. कधी मशीन बिघडल्याचे कारण सांगण्यात येते, तर कधी मशीन चालवणारा कर्मचारी नाही असे कारण देत लोकांना वेठीस धरले जात असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

लाकडे आणि गोवऱ्या उघडय़ावर

अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडे आणि गोवऱ्या ठेवण्यासाठी बंदिस्त खोली असली पाहिजे. मात्र, या घाटावर उघडय़ावर लाकडे, गोवऱ्या पडलेल्या दिसतात. ज्या कंत्राटदाराचे त्याकडे दुर्लक्ष आहे, येथून लाकडाची अनेकदा चोरी होते. सरणापर्यंत लाकडे घेऊन जाण्यासाठी असलेली गाडी तुटलेली आहे. सरण रचण्यासाठी २०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतात. ८० ते ९० रुपये लिटर या भावाने रॉकेल विकले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घाटावर सरण रचण्यासाठी १४ ओटे आहेत, परंतु त्यापैकी १० ओटय़ांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सरण रचून अंत्यसंस्कार करावे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडतो. चांगले ओटे आहे त्या ठिकाणी राख पडलेली असते. गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी सिमेंटीकरण करण्यात आलेले नाही. ओटय़ांवर मोठे खड्डे पडले आहेत. त्याच्या आजूबाजूला अस्वच्छता असते. घाटावर आलेल्या लोकांना तेथील स्वच्छता करावी लागते. टिनाचे शेड तुटलेले आहे. पावसाळ्यात चितेवर पाणी पडते. शेड बदलवण्यासाठी नगरसेवकांना सांगण्यात आले होते, पण त्यांनी दुर्लक्ष केले.