अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. संभाव्य नाराजी नाट्य लक्षात घेता अद्याप प्रमुख पक्षांनी उमेदवारांच्या नावाचे पत्ते उघडले नाहीत. युती व आघाड्या की स्वबळ याचा निर्णय गुलदस्त्यात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने मात्र उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली. नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवारांची यादी वंचित आघाडीकडून बुधवारी दुपारी जाहीर केली आहे.
नगर पालिका व नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असून छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल. या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तप्त झाले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे तीन दिवस निघून गेले तरी अद्याप प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावावर शिक्कमोर्तब झालेले नाही. राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवार निवडीचे मोठे आव्हान राजकीय पक्ष नेतृत्वापुढे दिसून येते. मुलाखतीची प्रक्रिया सुरू आहे. भाजपमध्ये इच्छुकांची प्रचंड गर्दी असून काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी स्पर्धा आहे.
वंचितकडून निवडूक लढण्यासाठी देखील अनेक इच्छूक आहेत. उमेदवार जाहीर होताच इतर इच्छूक नाराज होऊन बंडाचा झेंडा हातात घेऊ शकतात. अर्ज दाखल करण्यास मुदत असल्यास इतर पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून बंडखोर निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रमुख पक्षांनी सावध पवित्रा घेतला असून शेवटच्या क्षणी उमेदवारांचे नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. वंचितने मात्र अकोला जिल्ह्यातील चार नगराध्यक्षपदासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
ॲड. नतिकोद्दिन खतीब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बार्शीटाकळी नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी अख्तर खातूर अलीमोद्दिन, मूर्तिजापूर नगर पालिका शेख इम्रान शेख खलील, अकोट स्वाती मंगेश चिखले व तेल्हारा नगराध्यक्षपदासाठी विद्या सिद्धार्थ शामस्कर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारांची नावे ॲड. खतीब, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, अरुंधती शिरसाट, राजेंद्र पातोडे, प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, आम्रपाली खंडारे व मिलिंद इंगळे यांच्या स्वाक्षरीने जाहीर केले. बाळापूर आणि हिवरखेड येथील उमेदवार जाहीर होणे बाकी आहे.
