महाराष्ट्र पशुवैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर यांची खंत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट
मानवी आरोग्य, पशु आरोग्य आणि पर्यावरण आरोग्य या सर्वाचा समन्वय साधता येणारा विषय म्हणजे पशुवैद्यक शास्त्र. दुर्दैवाने भारतात त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. भारताबाहेर मात्र आरोग्य क्षेत्रापेक्षाही पुढचे स्थान पशुवैद्यक शास्त्राला आहे. विदेशात वन्यजीवांच्या उपचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. त्यावेळी आपण किती मागे आहोत हे जाणवते. आम्ही हेलिकॉप्टर सोडा, पण सायकलनेसुद्धा पोहचू शकत नाही, अशी खंत महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर यांनी व्यक्त केली.
लोकसत्ताला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी पशुवैद्यक शास्त्राचे अनेक पैलू उलगडले. डॉ. पोहरकर म्हणाले, जनस्वास्थ्य हा पशुवैद्यक शास्त्राचा विषय आहे, याची कल्पनाच फार कमी लोकांना आहे. जगाच्या पाठीवरील ७० टक्के आरोग्य अधिकारी हे पशुवैद्यक अधिकारी आहेत. पशुवैद्यक शास्त्रात वन्यजीवाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२, इंडियन पिनल कोड, भारतीय पशुवैद्यक कायदा, अन्न व औषध प्रशासन या सर्वामध्ये पशुवैद्यकांचे स्थान महत्त्वाचे आहे. भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर कुठेही या कायद्याच्या आधारावर पशुवैद्यक ‘एक्सपर्ट ओपिनियन’ देण्यासाठी सक्षम अधिकारी समजले जाते. मात्र, त्याची सेवा वापरली जात नाही ही शोकांतिका आहे. त्यामुळे परिषदेला त्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. वन्यजीव विभाग आणि पशुवैद्यक अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. कदाचित वनविभागातील उच्चपदस्थांना आमचा हस्तक्षेप नकोसा वाटत असेल. कायद्यानुसार वन्यजीव विभागातील विभागीय वनाधिकारी हा पशुवैद्यक अधिकारीच असायला हवा. वन्यजीवांच्या आरोग्याची आणि इतर गोष्टींची जबाबदारी पशुवैद्यकांशिवाय इतर कुणीही चांगल्या पद्धतीने हाताळू शकत नाही. गरजेच्या वेळीच वन विभागाजवळ नेमका पशुवैद्यक नसतो. वन्यजीवांसाठी पशुवैद्यकांची स्वतंत्र सुसज्ज विंग असावी. वेळप्रसंगी एका अभयारण्यातून दुसऱ्या अभयारण्यात जाण्यासाठी ‘मोबाईल अॅम्ब्युलेटरी’ सेवा असावी. याआधी सहाय्यक वनसंरक्षकांची पदे वन्यजीवांकरिता राखीव ठेवण्याचे निश्चित झाले होते. डिप्लोमाधारकाला त्यावर नियुक्ती देण्यात येणार होती. मात्र, ज्यांना पशुवैद्यक शास्त्रच माहिती नाही ते त्याठिकाणी कशी सेवा देतील? आम्ही त्यावर हरकत घेतली. त्यानंतर डॉ. नारायण दक्षिणकर यांच्या अध्यक्षतेत समिती गठित झाली आणि पदवीधर पशुवैद्यकांना घेण्याचे निश्चित झाले. नंतर माशी कुठे शिंकली कळले नाही आणि निर्णय अधांतरीच राहिला. वन्यजीव विभागात पशुवैद्यकांची एक वेगळी विंग असायला हवी. यांच्याकडे पशुवैद्यक नाही, जे कंत्राटी पद्धतीवर आहेत त्यांना वनरक्षकांसारखे ठेवले जाते. जितके जास्त अनुभवी वन्यजीव पशुवैद्यक तयार होतील तितका त्याचा फायदा वन्यजीव संवर्धनासाठी होणार आहे. मात्र, याकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते, याकडेही डॉ. पोहरकर यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्र पशुवैद्यक परिषद काय करणार?
* जंगलाचा उपयोग पशु खाद्य सुरक्षेकरिता कसा तयार करता येईल, यावर अध्ययनासाठी समिती गठित करण्यात येईल.
* पशुवैद्यकांची निरंतर गुणवत्ता वाढ करण्यासाठी वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येतील.
* होलिस्टिक मेडिसनच्या माध्यमातून स्वस्थ पशुचिकित्सा सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल.
* ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी पशुवैद्यक सक्षम बनतील यादृष्टीने अभ्यासक्रम तयार केला जाईल.
अवनी प्रकरणात कायद्याची पायमल्ली होऊ देणार नाही
पांढरकवडय़ातील अवनी या वाघिणीच्या प्रकरणात अजूनही परिषदेने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना दिलेल्या पत्राचे उत्तर आलेले नाही. परिषद ही ‘रेग्युलेटरी अॅथॉरिटी’ आहे. यात परिषदेच्या कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर न्याय पद्धतीने खुलासा मिळवू. त्या वाघिणीच्या शवविच्छेदनावेळी मी उपस्थित होतो. त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट आहे. यात कायद्याची पायमल्ली होऊ देणार नाही.
पशुधनसेवा अॅप लवकरच
पशुधनसेवा अॅप लवकरच सुरू करत आहोत. शेतकऱ्यांनी हा अॅप डाऊनलोड केल्यानंतर गरजेच्या वेळी म्हणजे अगदी मध्यरात्रीसुद्धा सेवा मागितली तर नोंदणीकृत आणि गुणवत्ता असलेल्या पशुवैद्यकाची सेवा त्यांना मिळेल. मेट्रो सिटीपासून तर गावपातळीपर्यंत ही सेवा उपलब्ध राहील. यात वन्यजीवांसाठी सेवेचा पर्याय देखील खुला राहील. पशुवैद्यकांच्या उच्च दर्जाच्या सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे हे आमचे ध्येय आहे.
गरीब शेतकऱ्यांच्या मुलांची काळजी घेऊ
परिषदेच्या जाहिरनाम्यानुसार, सामाजिक दायित्व निधी स्वीकारता येतो. गरीब शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांना पशुवैद्यक शिक्षण घेता यावे म्हणून त्यांची जबाबदारी आम्ही घेऊ. त्यासाठी विविध कंपन्यांकडून सामाजिक दायित्व निधी कसा मिळवता येईल, याचाही प्रयत्न करू. अधिकाधिक दर्जेदार शिक्षण त्यांना देण्याच्यादृष्टीने आमचे प्रयत्न राहतील, असेही डॉ. पोहरकर यांनी सांगितले.