उपराजधानीत तब्बल ५०० ते ७०० आंतरराष्ट्रीय सायकलींची विक्री; सायकल म्हणजे गुंतवणूक नसून विचार, आरोग्याविषयी सजग नागरिकांचा उपक्रमाकडे ओढा
भारतात बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई यासारख्या मोठय़ा शहरांची ओळख सायकलने तयार केली आहे. भारतात इतर शहरांच्या तुलनेत ही तिन्ही शहरे सायकल विश्वात पहिल्या क्रमांकावर आहेत. विदर्भसुद्धा आता त्याच वाटेवर असून सायकल हब, अशी नवी ओळख विदर्भाची तयार होत आहे. राज्याच्या उपराजधानीत तब्बल ५०० ते ७०० आंतरराष्ट्रीय सायकली विकल्या गेल्या आहेत.
सायकल म्हणजे पैशाची गुंतवणूक नव्हे, तर तो एक विचार आहे. चार दशकांपूर्वी सायकल हाच एकमेव पर्याय सर्वसामान्यांपुढे होता. मात्र, इंधनावरील वाहने आली आणि हळुहळू लोकांच्या आयुष्यातून सायकल हद्दपार झाली. आता पुन्हा गेल्या काही वर्षांत आरोग्यासाठी सजग असलेल्या नागरिकांना सायकलींकडे वळवण्यास भाग पाडले.
बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई यासारख्या मोठय़ा शहरांनी ही वस्तुस्थिती केव्हाच स्वीकारली होती आणि आता महाराष्ट्रातही पुणे, मुंबई या शहरानंतर विदर्भ ‘सायकल हब’ म्हणून ओळख निर्माण करत आहे. वेगवेगळ्या शहरात सायकल चमू तयार झाल्या आहेत. अकोला, वर्धा, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ या मोठय़ा शहरांसह समुद्रपूर, चिखली, खामगाव यासारख्या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर सायकलविषयी जनजागृती झाली आहे. वर्धा येथे डॉ. सचिन पावडे, बुलढाणा येथे डॉ. राजेश लहाने, वाशीम येथे श्रीनिवास व्यास, अमरावतीचे आत्राम कुटुंब, चिखली येथे दहा डॉक्टरांची चमू, अशा अनेकांनी सायकलसंस्कृती पुन्हा एकवार नव्याने उद्यास आणली. अकोला शहरात सुमारे ४०-४५ डॉक्टरांकडे आंतरराष्ट्रीय सायकली आहेत. चंद्रपुरातही प्रत्येक सोमवार हा ‘नो व्हेईकल डे’ म्हणून पाळला जातो.
नागपूर शहरातही ‘एन्सायक्लोपिडिया’ने सायकल ग्रुपची सुरुवात झाली आणि आता ‘हॉक रायडर्स’, ‘ऑरेंजर्स’, ‘मॉर्निग रायडर्स’ असे अनेक सायकल ग्रुप शहरात आहेत. विशेष म्हणजे, डॉक्टरांचा यात अधिक भरणा असून महिला आणि मुलीसुद्धा सायकल संस्कृतीत रमल्या आहेत. गेल्या एक वर्षांत सायकल संस्कृती प्रचंड फोफावली असून हा वेग असाच कायम राहिल्यास बंगलोर, हैदराबाद आणि चेन्नईपाठोपाठ नागपूरची ओळखसुद्धा ‘सायकल हब’ अशी व्हायला वेळ लागणार नाही. वाहनांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण मोठे आहे. ते रोखून पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर सायकलशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया सायकलप्रेमींमधून येत आहे.
हेटाळणीनंतर आता सायकल संस्कृती
अनिरुद्ध रईंच यांनी लोकसत्ताला दिलेल्या भेटीत सायकलींचा पट उलगडला. भारतातील वेगवेगळ्या शहरात प्रसारमाध्यमांमध्ये काम करीत असताना सायकलींकडे त्यांचा ओढा वाढला. दिल्लीत असताना त्यांनी कार्यालयात जाण्यासाठीसुद्धा शेवटची दीड-दोन वष्रे सायकलच वापरली. नोकरी सोडून नागपुरात परतण्यापूर्वी एक आठवडा ते नागपुरात फिरले. रोज एक तास नागपूर आणि परिसरातील गावे फिरायची आणि सायकलविरहित गावांमध्ये सायकलसाठी आग्रह धरायचा. सुरुवातीला त्यांना वेडय़ात काढले गेले आणि आता मात्र सायकल संस्कृती रुजवण्यासाठी तेच खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरले आहेत.
त्रिमूर्तीनगरातील ‘एन्सायक्लोपिडिया’
विदर्भातील या शहरांमध्ये सायकल संस्कृती पूर्वापार असली तरी त्यांना एकत्र आणण्यात आणि त्यांना जोडण्यात नागपुरातील अनिरुद्ध रईंच यांचा मोठा वाटा आहे. ‘अनिरुद्ध एन्सायक्लोपिडिया’ या नावाने त्यांनी फेसबुकवर सर्वाना जोडले. या पानाला दररोज हजारो लोक भेट देतात. सायकलविषयीच्या चर्चा या पानावर रंगतात. विदर्भातील कोणत्याही शहरातील सायकल उपक्रम या पानावर असतो आणि त्यातून सायकलविषयीची जनजागृती आणखी वाढते. त्रिमूर्तीनगरमधील ‘एन्सायक्लोपिडिया’ हे सायकलींचे दुकान सध्या नागपूरांसाठी एक अभ्यासगृह आहे. सायकल कशी वापरली पाहिजे, कोणती वापरली पाहिजे, सायकल चालवताना काळजी कशी घ्यावी, यावर ग्राहकांचे उद्बोधन करून मगच त्याला सायकल सोपवली जाते. त्यामुळे सायकल केवळ ‘शो’ म्हणून नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीने सायकलींचा वापर या दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले जात आहे.