अकोला : पीक कर्जासाठी विविध शुल्काच्या नावाखाली विदर्भ कोकण ग्रामीण बँक शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. बँकेने शेतकऱ्यांना अंत पाहू नये, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने तत्काळ विविध शुल्काच्या नावावरील शेतकऱ्यांची लूट थांबवावी व आतापर्यंत वसुल केलेले शुल्क शेतकऱ्यांना परत करावे, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे केली. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी बँकेला भेट देऊन विभागीय व्यवस्थापकांशी सविस्तर चर्चा करून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आदी राष्ट्रीयीकृत बँका शेतकर्यांना पीक कर्ज देतांना इतर शुल्क आकारत नाहीत. मात्र, विदर्भ कोकण ग्रामीण बँक विविध प्रकारचे शुल्क आकारत आहेत. विमा हप्ता, प्रक्रिया शुल्क, तपासणी शुल्क, दस्तऐवज शुल्क, सीबील शुल्क व इतर विविध सेवा शुल्काच्या नावाखाली विदर्भ बँक शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेसने केला आहे.
सध्या शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट स्वरूपाची आहे. शासनाने पिकांसाठी आधारभूत किंमत जाहीर केली तरी प्रत्यक्षात शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. यावर्षी दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे उत्पन्नात घट झाली. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. या गंभीर परिस्थितीत शेतकर्यांना केवळ कर्जाची गरज असते. मात्र, विविध नावाने शुल्क आकारुन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने विविध शुल्कांची वसुली तत्काळ बंद करावी, अगोदर घेतलेले शुल्क शेतकर्यांना परत करावे, शेतकर्यांना कर्ज देतांना पारदर्शक व न्याय प्रक्रिया ठेवावी, शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेच्या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करावे आदी मागण्या काँग्रेसने निवेदनातून केल्या आहेत.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, माजी जिल्हा परिषद सदस्य आलमगीर खान, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे महानगराध्यक्ष मोहम्मद एजाज, अॅड. सुरेश ढाकोलकर, तश्वर पटेल, राजेश मते पाटील, प्रा.दिनकर पाटील, राजू वानखडे, काँग्रेस कमिटीचे सहचिटणीस देविदास नेमाडे, नागसेन सिरसाट, जानराव पागृत, पुंडलिक लोथे, प्रमोद पागृत, उमेश गव्हाळे, विकास वाघ आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.