आता ऑगस्ट संपायला आला तरी विदर्भातील एकाही नदीला पूर आलेला नाही. प्रचंड पावसामुळे लहान, मोठय़ा व मध्यम धरणांमधून होणारा पाण्याचा निचराही बघायला मिळालेला नाही. दरवर्षी पुरामुळे निर्माण होणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी नेमण्यात आलेल्या आपत्ती निवारण कक्षात कमालीची शांतता आहे. या कक्षातील कर्मचाऱ्यांच्या हाताला यंदा कामच नाही. कमी पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या चाहुलीने सारेच सध्या धास्तावले आहेत. पावसाळा कोरडा जाणे म्हणजे काय असते, याचा अनुभव विदर्भातील जनता सध्या घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यानंतर कोकण वगळता विदर्भातील गडचिरोली जिल्ह्य़ात सर्वाधिक पाऊस पडतो. याठिकाणी नद्यांचे जाळेही मोठे आहे. मध्य प्रदेशात अधिक पाऊस  झाला तरीही इथपर्यंत पाणी येते. प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या गडचिरोली जिल्ह्य़ातील नद्यांना येणाऱ्या पुरामागे मध्य प्रदेशातील पाऊस कारणीभूत आहे. यावर्षी मात्र या नद्यांमध्ये पाणीसाठा अतिशय कमी आहे. कारण मध्य प्रदेशातसुद्धा पावसाचे प्रमाण कमी आहे. या नद्यांचे काठापर्यंतसुद्धा पाणी आलेले नाही. यापूर्वी याच नद्यांमुळे आठ-आठ दिवस गावांचा संपर्क तुटल्याचे ऐकिवात आहे. वैनगंगा, वर्धा या नद्यांना दरवर्षी पूर येतो, पण यावर्षी या नद्यांमध्ये जलसाठा कमी आहे. मागील १५ दिवसांत थोडा पाऊस झाला तेव्हा या नद्यांमध्ये थोडाफार जलसाठा वाढला. गडचिरोलीतील पर्लकोटा, पामुलगौतम या नद्यांनाही पूर आलेला आहे. भंडारा जिल्ह्य़ातील पैनगंगा या नदीला येणाऱ्या पुराचा फटका कित्येकदा जिल्ह्य़ातील नागरिकांना बसला आहे. ही नदीसुद्धा या वेळी शांत आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात इरई नदीला पूर येत नाही, पण धरणाच्या पाण्यामुळे नद्या फुगतात आणि मग पूर येतो. मात्र यावर्षी नद्यांमध्येच पाणी नसल्याने धरणे भरण्याचा प्रश्न उद्भवलेलाच नाही. अमरावती जिल्ह्य़ातून वाहणारी पूर्णा नदी अकोल्यात आणि मग अकोल्यातून बुलडाण्यात जाते. या नदीवर असणारे पूल अतिशय कमी उंचीचे आहेत. त्यामुळे थोडाही पाऊस आला तरीदेखील पूरसदृशस्थिती याठिकाणी निर्माण होते आणि वाहतूक बंद होते. मात्र या वेळी पावसाचे प्रमाणच अतिशय कमी असल्यामुळे पूरसदृश स्थितीही दिसून आली नाही. वलगावजवळील पिढी नदी, अंजनगाव सूर्जी तालुक्यातून भुलेश्वरी नदी या नद्याही पूरग्रस्त नद्या म्हणून ओळखल्या जातात. तर मोठय़ा नद्यांपैकी दर्यापूरहून वाहणारी चंद्रभागा ही मोठी नदी आहे. मोठय़ा नद्या तर दूरच राहिल्या, पण छोटय़ा नद्यांमध्येही जलसाठा अतिशय कमी आहे. शहानूर नदीला येणाऱ्या पुरामुळे कित्येकदा या धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आलेली आहे. या वेळी ती स्थिती उद्भवलेली नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha rainfall water issue in vidarbha
First published on: 23-08-2017 at 02:31 IST