अकोला : विदर्भातील सोयाबीन पिकावर खोडमाशी व चक्रीभुंगा किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.वेळीच उपाययोजना न केल्यास ३० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याचा धोका असतो. या दोन्ही किडींचे वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी दिली.

बीज प्रक्रिया न केलेल्या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनचे पीक सद्यस्थितीत ३० ते ३५ दिवसांवर आले. या दरम्यान सोयाबीन पिकावर खोडमाशी व चक्रीभुंगा किडींच्या प्रादुर्भावाची शक्यता असते. खोड माशी लहान, चमकदार काळ्या रंगाची असून त्यांची लांबी दोन मि.मी. असते. अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची,

दोन ते चार मि.मी. लांब असते. अळी जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. अळी झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरुन खाते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात किंवा खोडात असतो. किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्यांचे वजन कमी होऊन उत्पादनात १६ ते ३० टक्के घट होते, असे डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी सांगितले.

चक्रीभुंग्याची मादी पानाच्या देठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर अंडी टाकते. अंड्यातून निघालेली अळी पानाचे देठ अणि फांदीतून आत जाते. मुख्य खोडाचा भाग पोखरते. या किडीचा प्रादुर्भाव मुंग, उडीद, चवळी आदी पिकांवर सुद्धा होऊ शकतो. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने, फांद्या व मुख्य खोडाचा भाग वाळतो.

पीक दीड महिन्याचे झाल्यावर चक्रिभुंग्या प्रादुर्भावग्रस्त झाडे वाळत नाही, मात्र कमी शेंगा लागतात. परिणामी, उत्पादनात घट येते. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे नियमित सर्वेक्षण करून सतर्क राहून नियंत्रणाचे उपाययोजना करण्याचा सल्ला डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी दिला.

एकीकृत व्यवस्थापन आवश्यक

शेतकऱ्यांनी शेतीचे बांध स्वच्छ ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडीच्या पुरक वनस्पतीचा नाश करणे आवश्यक आहे. अंडी, अळी असलेली पाने काढून नष्ट करावीत, पिवळे चिकट सापळे लावावे, खोडमाशी व चक्रीभुंगा प्रादुर्भावाग्रस्त झाडे, पाने, फांद्यांचा किडीसह नायनाट करावा, शेतात हेक्टरी १५ ते २० पक्षी थाबे लावावेत, प्रतिबंधात्मक उपायासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी आदी उपाययोजना डॉ. उंदिरवाडे यांनी सूचवल्या आहेत.