नागपूर : रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंटीकरण करताना रस्त्यालगतच्या झाडांसाठी आजूबाजूला जागा सोडण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या मुळाला पाणी मिळत नाही. अशाप्रकारच्या नागपूर महापालिकेने चिन्हित केलेल्या शहरातील ४ हजार १४७ झाडांच्या बुंध्यालगत जागा मोकळी करावी, असे आदेश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी संबंधित विभागांना दिले.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पार पाडली. नागपूर शहरातील विविध सिमेंट व डांबरी रस्ते बांधणी करताना झाडांच्या बुंध्यालगत सिमेंट व डांबर टाकण्यात आल्याने झाडांचे बुंधे अवरोधित झाले होते. याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली २० मार्च २०२५ रोजी समिती गठित करण्यात आली होती. या समितीची पहिली बैठक आज पार पडली.

केंद्रीय नगर विकास मंत्रालयाच्या अर्बन ग्रीन गाईडलाईन २०१४ नुसार नागपूर महापालिकेने चिन्हित केलेल्या शहरातील प्रत्येक झाडाच्या बुंध्यालगत १.२५×१.२५ मीटर जागा सोडण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश बिदरी यांनी संबंधित विभागांना दिले. चिन्हित एकूण झाडांपैकी ३७० झाडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ३६ झाडे राज्य महामार्ग, २९४ झाडे सार्वजनिक बांधकाम विभाग, १०१ झाडे सार्वजनिक बांधकाम विभाग (जागतिक बँक), ९ झाडे मेट्रो, ११ झाडे नागपूर सुधार प्रन्यास आणि ३ हजार ३२६ झाडे नागपूर महापालिकेच्या अखत्यारित असून संबंधित विभागांनी नियोजित वेळेत कार्यवाही पूर्ण करून तसा अहवाल समितीच्या पुढील बैठकीत सादर करावा, असे बिदरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

उच्च न्यायालयाने यासंदर्भात ४ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या आदेशात समितीवर दोन स्वतंत्र तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचे सूचित करण्यात आले होते. यासाठी महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासकडून प्रत्येकी एका तज्ज्ञाचे नाव सुचवण्यात आले असून त्यास अध्यक्षांनी मान्यता दिली आहे.

बैठकीला समितीचे सदस्य सर्वश्री महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., उपायुक्त (उद्यान) गणेश राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, विभागीय सहआयुक्त (नगर परिषद प्रशासन) मनोजकुमार शहा यांच्यासह महामेट्रो, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

कुणाच्या रस्त्यावर किती झाडे

यंत्रणा            संख्या

महापालिका ३३२६

एनएचआय ३७०

सा. बांधकाम ३९५

राज्य महामार्ग ३६

नासुप्र रस्ते ११

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रोचे रस्ते ०९