यवतमाळ : समाज माध्यमावर ‘साधा माणूस’म्हणून प्रसिद्ध असलेल्या, मारेगावच्या विलास झट्टे यांनी आता अभिनयात पुढचे पाऊल टाकले आहे. त्यांच्यावर चित्रित झालेले ! साधा माणूस विल्या रं…’ हे गाणे मंगळवार, १९ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. ग्रामीण जीवनावर आधारित या गाण्याबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

आपल्या कल्पनाशक्तीतून ग्रामीण जीवनावर वास्तववादी, विनोदी आणि प्रबोधनात्मक रील्स बनवून, विलास झट्टे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. आता ते स्वतःवर चित्रित गाणे घेऊन येत आहेत. या गाण्याचे प्रदर्शन मंगळवारी वणी येथील श्री विनायक मंगल कार्यालयात होणार आहे. या गाण्याचे चित्रीकरण वणी तालुक्यातील साखरा (दरा) आणि मारेगाव येथे झाले. या गाण्यात विलास झट्टे मुख्य भूमिकेत असून, त्यांना रवी वानखेडे, विक्की खडसे, आदी निरगुळे, तन्मय सरोदे, आकाश महाडुळे, नितीन मुंजेकर, अमोल खडसे, संदीप डोंगे, कुणाल मुत्यलवार, गौरव दोडके, करण गेडाम, जतिन राऊत, कार्तिक नेहारे, संकेत जक्कुलवार, राणी तेलंग, भारती तेलंग, अणु धुमणे, कोमल किन्हेकर, जोत्स्ना बदखल, शुभांगी निकोडे, वैष्णवी कुक्केवर, श्रुतिका डोंगे, अविनाश आपापल्लीवार, मंजूषा कोनप्रतीवार, स्वाती लिहितकर आणि रौनक बदखल यांनी साथ दिली आहे.

या गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायक महेश बेंद्रे आहेत. संगीत संयोजन शुभम चांदोरे यांनी केले आहे. विदर्भातील प्रसिद्ध यूट्यूबर रवी वानखेडे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे, तर नृत्यदिग्दर्शन जतिन राऊत यांचे आहे. छायाचित्रण इरफान शेख यांनी केले आहे.

कोण आहे हा ‘साधा माणूस’?

विलास झट्टे हे मारेगाव येथील रहिवासी असून, ’साधा माणूस’ या नावाने ते सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. ते ग्रामीण जीवनावर आधारित वास्तववादी, विनोदी आणि प्रबोधनात्मक रील्स बनवतात. रोजच्या जीवनात भेडसावणारे प्रश्न, त्यावर सामान्य माणूस शोधत असलेले उपाय, सहज घडणारे विनोद हे सर्व विलास आपल्या रील्समधून सहजपणे मांडतात. ग्रामीण भागातील माणसाचा साधेपणा आणि भोळेपणा ते आपल्या रील्समधून प्रभावीपणे दाखवतात. फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर त्यांचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. २०२४ मध्ये ‘लोकसत्ता विदर्भरंग’ दिवाळी अंकात त्यांची दखल घेण्यात आली होती.