नागपूर: बकरी ईद म्हणजे कुर्बानीचा सण. या दिवशी मुस्लीम बांधव कुर्बानी म्हणून बोकडाचे (किंवा इतर प्राण्यांचे) बळी देतात. या बलिदानातून मिळालेल्या मांसाचा काही भाग गरीब आणि गरजू लोकांना वाटला जातो. परंतु, यावर आता विश्व हिंदू परिषदेने विरोध नोंदवला आहे. त्यांच्याकडून बकरी ईदला विरोध होत आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होते असाही दावा करण्यात आला आहे.
यंदा ७ जूनला बकरी ईद आहे. बकरी ईदच्या निमित्ताने होणारी गोवंशाची कत्तल थांबवावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. विहिंपचे महाराष्ट्र-गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी सरकारला याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. बकरी ईदला बकऱ्यांसह गायी, बैल आणि इतर प्राण्यांची कत्तल होत असल्याचा दावा शेंडे यांनी केला. पर्यावरणाच्या दृष्टीने हे हानिकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. शेंडे म्हणाले की, बकरी ईद बकरा कापूनच केली पाहिले असा कुराणमध्ये उल्लेख नाही. ते बंद होणे आवश्यक आहे.
बकरी ईदच्या नावाने लाखो बकरे कापले जातात. अन्य प्राणीही कापले जातात. गाय, बैल ही कापले जातात. मी मध्यप्रदेशात असताना एकदा उंट कापताना पाहिले. त्यामुळे बकरी ईद आहे की उंट ईद आहे, याचा विचार व्हायला हवा. तसेच बकरी ईदमध्ये कापल्या जाणाऱ्या बकऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान होते. जमिनीवर रक्त सांडत असून ते नदीमध्ये वाहून जाते. यामुळे पर्यावरणाची हानी होत असून पर्यावरण तज्ज्ञांनी याचा विचार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात गोवंश बंदी कायदा आहे. त्यानंतरही गाईची कत्तल केली जाते. त्यामुळे सरकारची ही जबाबदारी आहे. प्रशासनाने यावर लक्ष घालून गाेवंश हत्या बंदीचे काटेकोर पालन करावे, अशी मागणीही शेंडे यांनी केली.