सव्‍‌र्हर पुण्यात असल्याने व्होडाफोनची सेवा विस्कळीत;  ऐन कामाच्या वेळेस हजारो ग्राहकांना मन:स्ताप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या  मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळपासून नागपुरात व्होडाफोन-आयडिया अर्थात व्हीआयची सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागला. व्होडाफोनचे मुख्य सव्‍‌र्हर पुण्यात असल्याने ही समस्या उद्भवली.

सध्या हजारो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. अनेकांचे कार्यालयीन कामेही घरूनच सुरू आहेत. अशात आज गुरुवारी सकाळपासून व्होडाफोनची सेवा विस्कळीत झाली. पुण्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सातत्याने सुरू आहे आणि व्होडाफोनचे मुख्य सव्‍‌र्हर पुण्यातच आहे. तेथे वादळी अतिवृष्टी होत असल्याने  वीज खंडित करावी लागली. व्होडाफोनचे सव्‍‌र्हर सुरू ठेवण्यासाठी बॅटरी बॅकअपचा उपयोग केला गेला. मात्र पुण्यात ज्या भागात व्होडाफोनचे सव्‍‌र्हर व इतर यंत्रणा आहे त्या भागात अनेक तास वीज खंडित असल्याने बॅटरी बॅकअपही निकामी  झाले आणि व्होडाफोनची अख्खी यंत्रणा बंद पडली. परिणामी नागपुरातील व्हाडोफोनची सेवा विस्कळीत झाली. दुपारी अकराच्या सुमारास सेवा परत सुरळीत  झाली. परंतु या दरम्यान अनेकांची महत्त्वाची कामे रखडली. अगदी सकाळच्या वेळी मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकही संभ्रमात पडले होते. मोबाईल बिल न भरल्यामुळे सेवा थांबवली असावी, असेही काहींना वाटले. मोबाईल सेवा बुधवारच्या मध्यरात्रीपासूनच प्रभावित झाल्याचे एका ग्राहकाने लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

मोबाईल नेटवर्कअभावी परीक्षा खोळंबली

व्होडाफोन आणि आयडिया नेटवर्कच्या समस्येमुळे आज गुरुवारी उपराजधानीतील शाळा, महाविद्यालयांच्या ऑनलाईन परीक्षा व वर्गाना मोठा फटका बसला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्रांच्या परीक्षा सुरू असताना सकाळपासून व्होडाफोन आणि आयडियाचे नेटवर्क नसल्याने विद्यार्थी, पालकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला आहे. सध्या दिवाळीपूर्व होणारी प्रथम सत्रांतची परीक्षा सुरू आहे. या सर्व परीक्षा बहुतांश सकाळच्या पाळीत सुरू असतात. मात्र, नेटवर्कची समस्या असल्याने इंटरनेट जोडणीही बंद होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा देता आली नाही. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्गही सुरू आहेत. या विद्यार्थ्यांनाही  समस्येचा सामना करावा लागला.

कंपनीची दालनेही बंद

व्होडाफोनची सेवा विस्कळीत झाल्याने शहरात ग्राहकांकडून रोष व्यक्त होऊ शकतो, या भीतीने शहरातील व्होडाफोनची दालनेही बंद करण्यात आली होती. तसेच दालनाबाहेर ग्राहकांसाठी सेवा विस्कळीत झाल्या संदर्भात सूचनापत्रक लावण्यात आले. दुपारी चार वाजेपर्यंत सेवा पूर्वपदावर येईल त्यामुळे ग्राहकांनी संयम पाळावा असा संदेश त्यात होता. इंटरनेट सेवा दुपारनंतर सुरळीत झाली. मात्र अनेकांचे मोबाईल सायंकाळपर्यंत लागत नव्हते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodafone network problem in nagpur today zws
First published on: 16-10-2020 at 00:52 IST