प्रमाणपत्र नसल्याने लसवंताचा शिक्का नाही; ‘बूस्टर’ डोसबाबत अस्पष्टता

महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : करोना प्रतिबंधासाठी देशात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि  सिरम इन्स्टिटय़ूटच्या कोविशिल्ड या लसींचा वापर केला जातो. दोन्ही लशींची उपयुक्तता तपासण्यासाठी जी चाचणी झाली त्यावेळी अनेक स्वयंसेवकांनी जीवाची पर्वा न करता त्यात सहभाग घेतला. यापैकी अनेकांच्या लसीकरणाला वर्ष होत असतानाही त्यांच्या बूस्टर डोसबाबत मात्र अद्यापही स्पष्टता नाही. ते लस घेतलेल्या केंद्रांवर विचारणा करण्यासाठी येरझरा घालत आहेत.कोव्हॅक्सिन घेतलेल्यांची कोविन अ‍ॅपवर नोंदणीही नसून त्यांना रुग्णालय स्तरावरील प्रमाणपत्र दिले गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोव्हॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीत नागपुरातील गिल्लुरकर रुग्णालय व रहाटे रुग्णालयातील केंद्रांचाही समावेश होता. ही चाचणी यशस्वी झाल्यावर पुढे देशात लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्यांना वर्षांहून अधिक कालावधी होत आहे. तर दुसरीकडे एक वर्षांनंतर लस घेतलेल्यांमध्ये प्रतिपिंड (अ‍ॅन्टिबॉडी) कमी होत असल्याने त्यांना बुस्टर डोसची गरज असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. परंतु या स्वयंसेवकांच्या बुस्टर डोसबाबत केंद्र सरकार व संबंधित कंपन्यांकडून धोरणच स्पष्ट नाही. कोव्हॅक्सिन धारकांची कोविन अ‍ॅपवर नोंदणीही नाही. त्यामुळे त्यांना आयसीएमआर व आरोग्य मंत्रालयाची मंजुरी असलेले प्रमाणपत्र मिळत नसून रुग्णालय स्तरावरचे प्रमाणपत्र दिले जात आहे.   सिरम इन्स्टिटय़ूटकडून त्यांच्या चाचणीत सहभागी झालेल्यांचे आयसीएमआर व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे नावे पाठवण्यात आली. त्यानंतर स्वयंसेवकांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र कोविन अ‍ॅपवर नोंदणी करून दिले जात असल्याचे मेडिकलमधील कोविशिल्ड चाचणीचे समन्वयक डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले.

लवकरच प्रमाणपत्र..

गिल्लुरकर रुग्णालयाचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर म्हणाले, कोव्हॅक्सिन चाचणीत सहभागी स्वयंसेवकांची नावे आयसीएमआर व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पाठवली आहेत. त्यानुसार काही राज्यांत प्रमाणपत्र मिळणे सुरू झाले असून नागपुरातही लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी रुग्णालयाकडून संबंधित स्वयंसेवकांना तात्पुरते प्रमाणपत्र दिले आहे.

बूस्टरबाबत चाचणी..

पहिल्या टप्प्यातील चाचणीचे समन्वयक डॉ. आशीष ताजने म्हणाले, आता बूस्टर डोसबाबतचीही चाचणी सुरू असून त्यात नागपूरसह इतरही भागात पहिल्या टप्प्यात सहभागी काही स्वयंसेवकांना तिसरीही मात्रा दिली गेली. त्याचाही निष्कर्ष लवकरच येण्याची शक्यता आहे.  इतर शिल्लक राहिलेल्यांबाबतही निर्णयाची शक्यता आहे.

तीन टप्प्यांत..

भारत बायोटेककडून जुलै-२०२० मध्ये देशाच्या विविध केंद्रात पहिल्या टप्प्यात ३७५, सप्टेंबर २०२० मध्ये दुसऱ्या टप्प्यात ३७५ नागरिकांवर कोव्हॅक्सिन लशींची चाचणी करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात देशात २५ हजार ८०० जणांवर ही चाचणी झाली. कोविशिल्डच्या चाचणीबाबतही जवळपास अशीच प्रक्रिया झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Volunteer in the vaccine test enquire about booster s dosage zws
First published on: 02-09-2021 at 04:01 IST