‘इमेज टेक्स्ट टू स्पीच कन्व्हर्जन’ उपकरणाची निर्मिती

नागपूर : व्हीव्हीपॅटमध्ये प्रिंटरद्वारे छापल्या गेलेल्या कागदी प्रतीची प्रतिमा घेऊन त्यातील मजकूर वेगळा करणे आणि तो मजकूर ध्वनीत रूपांतरित करून मतदाराला हेडफोनच्या माध्यमातून ऐकवणारे ‘इमेज टेक्स्ट टू स्पीच कन्व्हर्जन’ हे उपकरण संशोधक डॉ. अक्षय बाजड यांनी तयार केले आहे.

दृष्टिहीन मतदारांना त्यांच्या मतांची पडताळणी करण्यास सक्षम बनवण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रात ही प्रणाली समाविष्ट केल्यास त्याचे चांगले परिणाम मिळू शकतील. या उपकरणात कॅमेरा, प्रोग्रॅमेबल यंत्रणा, हेडफोन आणि बॅटरी या चार मुख्य घटकांचा समावेश आहे. हे उपकरण व्हीव्हीपॅट यंत्रात बसवल्यानंतर मतदारांना व्हीव्हीपॅटच्या पारदर्शी खिडकीतून पाहण्यासाठी कोणताही अडथळा होणार नाही आणि सात सेकंदांपर्यंत जी छापील पेपर प्रत व्हीव्हीपॅटमध्ये दाखवली जाते, ती कॅमेऱ्यातील दुर्बिणीच्या दृश्यक्षेत्रात येईल. त्यात आवाज नियंत्रित करता येईल, असा हेडफोनचा एक सेट आवश्यक आहे. मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर मतदार हा हेडफोन लावेल. जेव्हा मत दिले जाते तेव्हा व्हीव्हीपॅटमध्ये एक पेपर प्रत छापली जाते. ज्यात अनुक्रमांक, उमेदवाराचे नाव, चिन्हाची प्रतिमा आणि चिन्हाचे नाव असते. ती सात सेकंदासाठी पारदर्शक खिडकीच्या माध्यमातून दाखवली जाते. हे उपकरण पेपर प्रतीची प्रतिमा कॅमेऱ्याद्वारे कैद करते.

प्रतिमेतील मजकूर काढण्याचे काम ‘ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन सॉफ्टवेअर’द्वारे केले जाते. त्यानंतर बाहेर पडणारा आवाज हेडफोनच्या माध्यमातून ऐकला जाऊ  शकतो. यात अनुक्रमांक, उमेदवाराचे नाव, उमेदवाराच्या चिन्हाचे नाव असते. हेडफोनवर ऐकणारा मतदार त्याच्या इच्छेनुसार मत दिले आहे की नाही हे ताबडतोब पडताळून पाहू शकतो. या प्रक्रियेदरम्यान या उपकरणात तयार झालेल्या तात्पुरत्या फाईल्स आपोआप हटतात व नवीन फाईल्ससाठी जागा तयार होते. या स्वतंत्र कार्य करणाऱ्या  प्रस्तावित प्रणालीत फेरफार होण्याची शक्यता नाही, असा डॉ. अक्षय बाजड यांचा दावा आहे.

दृष्टिहीन मतदारांच्या सोयीसाठी ईव्हीएमच्या बॅलेटिंग युनिटवर ब्रेललिपीत चिन्ह असतात. दृष्टिहीन मतदार जरी बटन दाबू शकत असले तरी प्रत्यक्ष कुणाला मत दिले गेले जे जाणून घेऊ  शकत नाही. आपले मत नोंदवले गेले की नाही आणि ते नोंदवले गेले असेल तर ते ज्या उमेदवाराला द्यायचे होते, ते त्यालाच दिले गेले की नाही, या गोष्टींची मतदाराला खात्री करता येत नाही. या उपकरणामुळे कुणाला मतदान केले हे समजता येणार आहे.

डॉ. अक्षय बाजड, संशोधक.