नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात जिल्ह्य़ातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी मतदान झाले आहे. गत वेळच्या तुलनेत जवळपास सात टक्के मतदान कमी झाले.

मुख्यमंत्री नागपूरचे असल्याने स्थानिक मतदार निवडणुकीत उत्साहाने सहभागी होतील, असे मानले जात होते. महाराष्ट्राचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाकडे लागले होते. भाजपने विकास आणि राष्ट्रभक्ती या मुद्दय़ांवर निवडणूक लढवली. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा तसेच  संघाचे मुख्यालय नागपुरातच आहे. त्यामुळे येथे भरभरून मतदान होईल, असा एक मतप्रवाह होता. परंतु नेमके मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात मतदारांनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात केवळ ४९.८७ टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ५६.२३ टक्के मतदान झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी यंदा घटली.  नागपूर जिल्ह्य़ात एकूण ५७.१९ टक्केमतदान झाले. राज्यात मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या मतदारसंघामध्ये दक्षिण-पश्चिम नागपूर (४९.८७ टक्के), पश्चिम नागपूर (४९.२२ टक्के), अमरावती (४९.४३ टक्के), धुळे शहर (४९.८३ टक्के), भुसावळ (४८.६६ टक्के), जळगाव शहर (४५.१३ टक्के) यांचा समावेश आहे. जिल्ह्य़ात सर्वाधिक मतदान काटोलमध्ये (६९.४४ टक्के) आणि उमरेड मतदारसंघात (६९.३७ टक्के) झाले. राज्यात सर्वाधिक मतदान नंदुरबार (७५.३७ टक्के) आणि त्या खालोखाल विदर्भातील वणी मतदारसंघात (७३.०४ टक्के) झाले.