वर्धा : वन्यप्राणी पण काही आवड राखून असतात. तेच ते नको म्हणून चव पालट करतात. नवे खाद्य मिळाले आणि त्याची एकदा चटक लागली की मग बघायलाच नको. म्हणून खाद्य मिळणारे स्थान कवटाळून बसण्याचा रोमहर्षक प्रकार अस्वलबाबत दिसून आला आहे.
घटना आष्टी तालुक्यातील व तळेगाव वनक्षेत्रातील आहे. या भागात बांबूरडा हे गाव जंगलात वसले आहे. त्यामुळे वन्यप्राणी आलेच. त्यांना कोण निर्बंध घालणार म्हणून गावकरी त्यांच्यासह निवास करतात. याच गावात पूर्वजचे मारोती मंदीर आहे. गावकरी नित्यनेमाने पूजा करतात. मारोती पूजा तेल अर्पण केल्याशिवाय प्रसन्न होत नाही. म्हणून तेलाचे रोज पाट वाहतात. याचा गंध अनेक प्राण्यांपैकी एका अस्वलाला आला.
हे अस्वल एकदा तेलाची चव चाखून चुकले. नंतर त्याची चटकच लागली. तेल कुठे गायब होते, याची गावाकऱ्यांना गंधवार्ता नव्हतीच. पण घटनेच्या दिवशी रहस्य उलगडले. रात्रीच्या सुमारास एक अस्वल मारोती मूर्तीस कवटाळून बसल्याचे रात्री फिरणाऱ्या काही लोकांना दिसले. अस्वल गावात म्हणून भिती पसरली. एकच हाकारा सुरू झाला. मंदिराचा ताबा अस्वलने घेतल्याने मोठी गर्दी जमा झाली. याची माहिती वन खात्यास मिळाली.
मोठी गर्दी पाहून मग अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले. ७० ते ८० वन व पोलीस अधिकारी कर्मचारी हजर झाले. अस्वल दुखावून कदाचित हल्ला करेल, अशी भिती. पण सावध होत वन अधिकाऱ्यांनी अस्वलास घेरले. एका बाजूचे कुलूप ठोकत नाकाबंदी केली. दुसऱ्या वाटेने पिंजरा लावला. अखेर अस्वल कल्लोळ पाहून पिंजऱ्यात शिरले. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
वर्धा : बांबूरडा गावात रात्रीच्या सुमारास एक अस्वल मारोती मूर्तीस कवटाळून बसल्याचे रात्री फिरणाऱ्या काही लोकांना दिसले. अस्वल गावात म्हणून भिती पसरली. मंदिराचा ताबा अस्वलने घेतल्याने मोठी गर्दी जमा झाली. pic.twitter.com/LsCn1Rdq44
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) April 3, 2025
उपवनक्षेत्र अधिकारी विजय सूर्यवंशी म्हणाले की तेलाच्या वासाने अस्वल मंदिरात शिरले असावे. अस्वल तेल पिते. म्हणून कदाचित ठिय्या मांडून असावे, असे ते म्हणाले. अस्वलाचे खाद्य म्हणजे मोहाफूल, मधाचे पोळे, उधई या स्वरुपात असते. तळेगाव या अन्य गावातील हनुमान मंदिरात पण अस्वल तेल पिऊन गेल्याची चर्चा झाली. पण गावाकऱ्यांनी तक्रार केली नसल्याने दखल घेतल्या गेली नाही. बांबूरडा हनुमान मंदिरातील अस्वल रेस्क्यू ऑपेरेशन रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत चालले. वन संरक्षक हरवीर सिंग, सहायक वन संरक्षक पवार यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम दयानंद कोकारे व विजय सूर्यवंशी यांच्या चमुने पार पाडली.