वर्धा : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार वृष्टीने जिल्हा जलमय झाला असून ग्रामीण भाग त्रस्त झाल्याचे चित्र आहे. त्यातच नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले. लहान पुलावरून पाणी वाहू लागले असल्याने वाहतूक न करण्याचा इशारा प्रशासनाने दिला. मात्र काही बहाद्दर त्यास जुमानत नाहीच. आणि मग आपत्ती ओढवते. इथे तसेच झाले.

जाम येथे जाण्यासाठी टाटा आयशर ही गाडी माल घेऊन निघाली होती. वाटेत वाघाडी नदीवर पूल असून त्यावरून पाणी वाहू लागले होते. मात्र चालकाने त्याची तमा नं बाळगता गाडी पाण्यात टाकली. पाण्याचा वेग अनावर असल्याने ही गाडी सरकत सरकत नदीत पडली. चालकासह विलास शहाणे व हिरालाल गुज्जर हे कसेबसे गाडीतून निघत झाडाला लटकले. बराच वेळ ते झाडाला लटकून होते. ही घटना पाहणाऱ्यांनी लगेच प्रशासनास कळविले. बचाव चमू लगेच घटनास्थळी पोहोचली. त्यांनी पाण्यात उडी मारून तिघांनाही वाचविले. तहसीलदार कपिल हटकर यांनी मोठ्या प्रयत्नांनी तिघांचे प्राण वाचल्याचे नमूद केले. चालकास पाण्यात गाडी नं टाकण्याची विनंती इतर दोघांनी केली होती. पण न ऐकल्याने जिवावर बेतता बेतता राहले, अशी भावना सुखरूप असलेल्या विलास शहाणे याने व्यक्त केली.

हेही वाचा – श्याम मानव यांनी राजकीय भाष्य केले असेल तर गैर काय – बच्चू कडू

सतत वृष्टी सूरू असल्याने ग्रामीण रस्ते उखडले आहे तर काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे. आज विखनी नाल्याला पूर आल्याने हा मार्ग बंद पडला आहे. तर सेलू तालुक्यातील पहिलाणपूर ते दहेगाव गोसावी हा मार्ग पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प पडली. गाडी वाहून जाण्याची घटना घडलेल्या भागात चांगलीच वृष्टी सूरू आहे. समुद्रपूर तालुक्यातील जाम, गिरड, वयगाव, कांधली, माणगाव, या महसूल मंडळात सरासरी ८० ते ८८ मिमी पावसाची नोंद झाली. एकूण ५२७ मिमीची पर्जन्य नोंद झाली.

हेही वाचा – “महविकास आघाडीत ११ ‘इ-मुख्यमंत्री’; नशीब त्यांनी व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेड…” मुनगंटीवार यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सदर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर परत सतर्क राहून घराबाहेर नं पडण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील पांजरा बोथरा, उमरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, रोठा, कुऱ्हा, शिरुड व अन्य लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर हे तालुके सततच्या पावसाने धुवून निघाले आहे. तर मोठे व माध्यम धरणे पूर्ण भरण्याची वाटचाल करीत आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी काठच्या गावांना सतर्क करण्यात आले आहे.