अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. वाशीम जिल्ह्यात ही निवडणूक भाजप व काँग्रेससाठी आव्हानात्मक ठरेल. या अगोदर वाशीम जिल्ह्यात नगरपालिका व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित व स्थानिक आघाडीचे वर्चस्व होते. ते आपले गड राखणार की परिवर्तन होणार? याची उत्सुकता आहे. भाजप व काँग्रेसच्या आमदारांसह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांपुढे अस्तित्वाचे आव्हान राहणार आहे.
वाशीम जिल्ह्यात अद्याप युती-आघाडीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. वाशीम, कारंजा, मंगरुळपीर व रिसोड नगरपालिका व मालेगाव नगर पंचायतीसाठी निवडणूक होत आहे. यात वर्चस्व राखण्यासाठी पक्ष नेतृत्वाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने त्या पदासाठी प्रचंड चुरस आहे. आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी दिसून येते. उमेदवारी वाटपानंतर सर्वच पक्षांमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे लक्षात घेऊन नेतृत्व ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत.
नगराध्यक्षपदावर प्रामुख्याने सर्वांचे लक्ष आहे. युती व आघाडी झाल्यास नगराध्यक्ष पदासंदर्भात वाटाघाटी करावी लागेल. ही स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते. कार्यकर्त्यांना योग्य न्याय देताना नेत्यांची चांगलीच कोंडी होत आहे. नेत्यांपुढे अस्तित्वाचादेखील प्रश्न आहे. या अगोदर झालेल्या निवडणुकीत वाशीम नगरपालिकेवर शिवसेनेचे नगराध्यक्ष होते. त्यावेळी शिवसेना एकसंघ होती. आता शिवसेना विभागली. परिस्थितीसह समीकरणात मोठा बदल झाला.
महायुती झाल्यास आता शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदावर दावा राहील. ‘मविआ’मध्ये देखील तेच चित्र राहू शकते. मंगरुळपीर व कारंजा या नगरपालिकांवर वंचित आघाडीचे नगराध्यक्ष होते. कारंजा आणि मंगरुळपीर येणाऱ्या वाशीम विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहेत. या दोन्ही आमदारांपुढे आपल्या मतदारसंघांतील नगरपालिकांवर पक्षाचा झेंडा फडकावण्याचे आव्हान राहणार आहे.
रिसोडमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वातील जनविकास आघाडीचे वर्चस्व होते. आता ते भाजपमध्ये आहेत. भाजपसाठी ती जमेची बाजू ठरेल. रिसोडमधून सलग निवडून येणारे काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्यापुढे सुद्धा रिसोड नगर पालिकेवर वर्चस्व निर्माण करण्याचे आव्हान असेल. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार भावना गवळी यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे. मालेगाव नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष होते. आता त्याठिकाणी देखील चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
६९ प्रभाग, पाच नगराध्यक्ष पदांसाठी निवडणूक
वाशीम जिल्ह्यातील चार नगरपालिका व एका नगर पंचायतीमध्ये एकूण ६९ प्रभागातील १३८ सदस्य व पाच नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. यामध्ये वाशीम १६, कारंजा १५, मालेगाव १७, रिसोड ११ व मंगरुळपीरमधील १० प्रभागांचा समावेश आहे. वाशीम, मंगरुळपीर नगरपालिका व मालेगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्षपद नामाप्र, तर कारंजा सर्वसाधारण महिला, रिसोड सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.
