अकोला : वाशीम जिल्ह्यातील वाशीम, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर या चार नगर पालिका व मालेगाव नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्यास उमेदवारांनी झुंबड उडाली आहे. रविवारी एकाच दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १९ तर सदस्य पदासाठी तब्बल २०१ अशा ३६५ नामनिर्देशन अर्जांची नोंद निवडणूक विभागाकडे झाली. आतापर्यंत अध्यक्षपदासाठी ४० अर्ज, ६४५ अर्ज सदस्य पदासाठी दाखल झाले आहेत.
वाशीम जिल्ह्यात नगर पालिका व नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. १६ नोव्हेंबरला रविवार असूनही अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षांतराचा झपाटा सुरू आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत एकूण नगराध्यक्ष पदासाठी ऑनलाइन ३८ व ऑफलाइन दोन असे एकूण ४० अर्ज प्राप्त झाले आहेत.
यामध्ये सर्वाधिक ११ अर्ज वाशीम नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आले आहेत. कारंजा तीन, रिसोड ऑनलाइन आठ आणि ऑफलाइन दोन असे १०, मंगरुळपीर १० आणि मालेगाव नगर पंचायतीचा नगराध्यक्ष होण्यासाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत. सदस्य पदांसाठी एकूण ६४५ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक १९६ अर्ज वाशीम नगर पालिकेच्या सदस्य पदासाठी आहेत.
कारंजा ऑनलाइन १३४ व ऑफलाइन नऊ, रिसोड १३१ ऑनलाइन व ऑफलाइन तीन, मंगरुळपीर ११४, मालेगाव नगर पंचायतीच्या सदस्य पदांसाठी ५७ ऑनलाइन व एक ऑफलाइन अर्ज दाखल झाला. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी देखील सुरू होती. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडत असून उमेदवारांकडून मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे निवडणुकीची रंगत वाढली.
जिल्ह्यातील पाचही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारी असल्याने उमेदवार-समर्थकांची गर्दी चांगलीच वाढत आहे. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड राहण्याची शक्यता दिसून येते.
‘माझे मत, माझा अधिकार’; मतदार जनजागृती
नगर पालिका व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वीप कार्यक्रमांतर्गत वाशीम नगर पालिका निवडणूक विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीपर विशेष रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘माझे मत, माझा अधिकार’ या महत्त्वपूर्ण संकल्पनेवर आधारित या स्पर्धेला वाशीमकर नागरिक व एनसीसी कॅडेट्सकडून उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला.
