अकोला : वाशीम शहरातील व्यवहारे बोळीमध्ये दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन तुफान दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. तलवारी, लोखंडी रॉड, पाईप हातात घेऊन भर वस्तीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न दोन्ही गटाकडून झाला.
समाज माध्यमावर ‘स्टेटस’ ठेवण्यावरून हा वाद टोकाला गेल्याची माहिती आहे. दोन्ही गटाकडून परिसरात प्रचंड दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आरोपींची धरपकड सुरू केली. दगडफेकीची घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याची चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये वाशीम अत्यंत संवेदनशील शहर म्हणून पुढे येत आहे. वाशीम शहरातील व्यवहारे बोळीमध्ये समाज माध्यमावर स्टेटस ठेवण्यावरून दोन गटात मोठा वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन्ही गट आमने-सामने आले. हातात शस्त्र घेऊन त्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीच्या घटनेमध्ये परिसरातील वाहनांचे देखील नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळताच वाशीम पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली. मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळावर दाखल होत गोंधळ घालणाऱ्या आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाची तपासणी करून आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली. दोन्ही गटातील २० आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा दगडफेक
वाशीम शहरात सव्वा महिन्यात दुसऱ्यांना दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यापूर्वी १२ मे रोजी दोन गटातील किरकोळ वादातून दगडफेक झाल्याची घटना वाशीम शहरातील पाटणी चौकात घडली होती. या घटनेचे पडसाद शहरातील इतर भागातही उमटले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या दगडफेकीच्या घटनेत दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा दगडफेक झाल्याने वाशीम शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.