यंदा मार्चअखेर ग्रामीण भागात पाणी टंचाईच्‍या झळा जाणवू लागल्‍या असून मेळघाटातील अनेक गावांमध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍याचे संकट आहे. आकी या गावात टँकरने पाणी पुरविण्‍यात येत आहे. याशिवाय चार तालुक्‍यांतील दहा गावांमध्‍ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्‍याची प्रक्रिया सुरू करण्‍यात आली आहे.

हेही वाचा >>>वर्धा: नाद खुळा! युवा शेतकऱ्याने साकारले ‘फाईव्ह स्टार’ मचान

जिल्हा परिषदेचा यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा १२ कोटी ६० लाख रुपयांचा आहे. यंदाही तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने ३३ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते. जिल्ह्यात यंदा ४९३ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकेत आहेत. मेळघाटासोबतच चांदूररेल्वे व अमरावती तालुक्यातील बहुतांश गावांनासुद्धा यंदा टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. धारणी व चिखलदरामध्ये सर्वाधिक ३१ टँकरची गरज भासणार आहे. यंदा प्राप्त झालेल्या नियोजनानुसार १२ कोटी ६० लाख रुपयांचा आराखडा पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. त्यामध्ये जवळपास ५०० गावांमध्ये उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. ६५० प्रकारच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. १४ तालुक्यांतून प्राप्त माहितीवरून आराखडा तयार करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे, यंदा चांदूररेल्वे आणि अमरावती तालुक्यातील जवळपास १९० गावामंध्ये पाणीटंचाई दाखविण्यात आली आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर : प्रदूषणात भर घालणारा लॉयड्स मेटल प्रकल्प बंद करा; नीरीचा अहवाल, कारवाई मात्र शून्य

नवीन नळयोजना, विहीर अधिग्रहण, विहिरींचे खोलीकरण, नळ योजनांची दुरुस्ती, नवीन नळ योजना घेणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण, नवीन विंधन विहिरी घेणे, हातपंपांची दुरुस्ती, टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा करणे आदी उपाययोजना प्रस्तावित आहेत. गेल्या वर्षीच्‍या उन्हाळ्यापासून ते जूनअखेरपर्यंत जिल्ह्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनातर्फे १० कोटी ५१ लाख २३ हजार रुपये खर्च करुन वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्‍या. जिल्हा परिषदेने तयार केलेल्या टंचाई निवारण आराखड्याच्या आधारे जानेवारी ते जून दरम्यान या उपाययोजना अंमलात आणल्या गेल्या.
मेळघाटातील चुर्णी या गावातील पाणी पुरवठा करणा-या विहिरीतील पाण्‍याची पातळी कमी झाली आहे, त्‍यामुळे विहिरीत पाणी जमा झाल्‍यानंतर तीन ते चार दिवसांनी पाणी पुरवठा करण्‍यात येतो. गावक-यांना जंगलातील इतर स्‍त्रोतांमधून पाणी मिळवण्‍यासाठी पायपीट करावी लागत आहे.