बुलढाणा: मागील वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला असतानाही यंदा मार्च महिन्याच्या प्रारंभीच पाणी टंचाईने डोके वर काढले आहे! अधिग्रहित खाजगी विहिरीद्वारे पाणी पुरवठ्याचे दुष्टचक्र सुरु झाले आहे हजारो गावकऱ्यांची तहान या विहीर भगवीत आहे. जिल्ह्यातील दुर्गम आणि जलस्रोत नसलेल्या गावातील रहिवासी प्रामुख्याने आया बहिणींची घडाभर पाण्यासाठी कैक मेल भटकंती सुरु झाली आहे. यामुळे मे महिना लाखो जिल्हावासी,जिल्हा प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणाची कसोटी पाहणारा ठरणार आहे.

  मागील वर्षीच्या पावसाळयात  समाधानकारक पावसाची नोंद झाली. अवकाळी आणि  परतीच्या पावसाने तेरा पैकी अर्ध्याअधिक तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी पर्जन्यमानाचा  आकडा ओलांडला. यामुळे यंदा पाणी टंचाईची तीव्रता कमी राहील असा अंदाज वर्तविण्यात आला. मात्र हा प्राथमिक अंदाज चुकीचा ठरला. यंदाच्या उन्हाळ्यात फेब्रुवारी अखेर आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पाणी टंचाईने डोके वर काढले. जिल्ह्यातील देऊळगाव राजा  तालुक्यात टंचाईची तीव्रता जास्त असल्याचे चित्र आहे.  या तालुक्यातील चार गावांना   आठ अधिग्रहित खाजगी विहिरीद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. जास्त लोकसंख्येच्या अंढेरा  गावासाठी चार खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहे. यामुळे या गावाची तहान अधिग्रहित विहिरीद्वारेच भागवली जात आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. याशिवाय याच तालुक्यातील डोड्रा, बोराखेडी बावरा, डिग्रस खुर्द या गावांना चार खाजगी विहिरीद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. याशिवाय मेहकर तालुक्यातील शेंदला, लोणार तालुक्यातील कौलखेड आणि शेगाव तालुक्यातील जानोरी या गावातील रहिवासियांना खाजगी विहिरीतून होणाऱ्या पाणी पुरवठ्या द्वारेच आपली तहान भागवावी लागत आहे. मेहकर तालुक्यातून विहीर अधिग्रहण चे आणखी दहा प्रस्ताव जिल्हा प्रशासन व पाणी पुरवठा विभागाकडे सादर करण्यात आले आहे.

 आठशेवर गावात टंचाई! दरम्यान यंदाच्या उन्हाळ्यात  जिल्ह्यातील १४१०पैकी  ८०६ गावात पाणी टंचाईची समस्या  भेडसावणार असा यंत्रणाचा अंदाज आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणा , जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग  यांनी केलेल्या सर्वेक्षणात  ही बाब आढळून आली आहे. यानंतर तयार करण्यात आलेल्या पाणी टंचाई कृती आराखड्यात  ८०६ गावासाठी १३४३ उपाय योजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये टँकर आणि अधिग्रहित खाजगी विहिरी द्वारे पाणी पुरवठा, बुडकी घेणे, नवीन विंधन विहिरी, नळ योजनाची दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, विहिरीचे खोलीकरण व गाळ काढणे, विंधन विहिरीची दुरुस्ती या योजनाचा समावेश आहे. या आराखड्यावर १६ कोटी ९६ लाख रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाही खाजगी विहिरीचे अधिग्रहण आणि टँकरने पाणी पुरवठा यावर यंत्रणाचा भर असल्याचे चित्र आहे. सहाशे चौऱ्या हत्तर गावासाठी सातशे चौवीस विहिरीचे अधिग्रहण करणे आणि एकशे पस्तीस गावांना  एकशे चौपन्न टँकरने पाणी पुरवठा करण्याची तरतूद आराखड्यात करण्यात आली आहे. विहिरीवर २कोटी ६३ लाख तर टँकर वर ७ कोटी ४४ लक्ष खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे जवळपास दहा कोटी रुपये या दोन योजनावर खर्ची होणार आहे.