नितीन गडकरींचे प्रतिपादन
शहरातील अनधिकृत वस्त्यांमध्ये महापालिकेला काम करणे शक्य नसल्यामुळे त्या भागात पाण्याच्या मोठय़ा प्रमाणात तक्रारी होत्या. मात्र, शासनाने निर्णय घेऊन ती समस्या दूर केली असून या अनधिकृत वस्त्यांमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या तीन वर्षांत नागपूर शहर टँकरमुक्त करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३२ व ३८ मध्ये दिव. लक्ष्मणराव बरबटे चौकाचे सौंदर्यीकरणाचे लोकार्पण आणि गायत्री टॉवर ते मोखारे कॉम्प्लेक्स रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूरची काळीमाती (ब्लॅक साईल)युक्त जमीन लक्षात घेता या ठिकाणी डांबरी रस्ते २-३ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत. तसेच दोन्ही बाजूच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरात पाणी तुंबण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात कमी झाले आहे. चोवीस बाय सात योजनेतंर्गत आतापर्यंत २ हजार कोटींची कामे करण्यात आली आहे. अनधिकृत वस्त्यांमध्ये कामे करू न शकल्याने त्या भागात मोठी पाण्याची अडचण निर्माण होत असल्यामुळे शासनाने आता महापालिकेला तसे अधिकार दिल्यामुळे त्या भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या तीन वर्षांत नागपूर शहर टँकरमुक्त करण्यात येणार आहे, असेही गडकरी म्हणाले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, यावेळी कृष्णा खोपडे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाला आमदार विकास कुंभारे, दयाशंकर तिवारी, बंडू राऊत, किशोर कुमेरिया, अनिल धावडे, आदी भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हर्षद घाटोळे यांनी केले.