विधिमंडळ अधिवेशनाचं आजचं कामकाज सुरू होण्याअगोदर भाजपाच्या आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील रेशीमबाग कार्यालयास भेट दिली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत सीमाप्रश्नावर बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला आणि सूचक इशाऱ्या प्रत्युत्तर दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री ठराव मांडतील आणि मला विश्वास आहे की एकमताने तो आपण मंजूर करू. फक्त मला काल बोलणाऱ्यांचं आश्चर्य वाटलं. की अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, काहीच केलं नाही. सीमाप्रश्न आमचं सरकार आल्यावर निर्माण झालेला नाही. सीमाप्रश्न महाराष्ट्राच्या निर्मितीपासून किंवा भाषावार प्रांतरचना तयार झाली तेव्हापासून आहे. तेव्हापासून वर्षानुवर्षे ज्यांची सरकारं आहेत, ते आता असं भासवत आहेत जणूकाही हे सरकार आल्यानेच सीमाप्रश्न तयार झाला. अशाप्रकारचं सीमाप्रश्नावर कधीच राजकारण झालं नाही. आम्ही अनेक वर्ष विरोधात होतो, पण सरकारच्या पाठीशी ताकदीने उभा राहिलो. कारण मराठी माणसाचा प्रश्न आहे. सीमावर्ती भागातील प्रत्येकाला हे वाटलं पाहिजे की, उभा महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे. राजकारण करायला शंभर गोष्टी मिळतील, त्यामुळे आम्ही कधी केलं नाही आणि आमची अपेक्षा आहे, की अशाप्रकारचं राजकारण यामध्ये करण्यात येऊ नये. संपूर्ण महाराष्ट्र हा सीमावर्तीयांच्या पाठीशी आहे, हाच भाव गेला पाहिजे.”

हेही वाचा – “ …तर महाराष्ट्रातील सरकारच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटेलच फुटेल” शिवसेनेचा सूचक इशारा!

याशिवाय उद्धव ठाकरे यांनी काल जोपर्यंत सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित घोषित करण्याचा ठराव घेतला जावा अशी मागणी केली होती. यावर फडणवीस म्हणाले, “मागणी करण्यासाठी कोणी काहीही मागणी करू शकेल. परंतु इतक्या वर्षात हे का झालं नाही? याचं उत्तर त्यांना पहिल्यांदा द्यावं लागेल.”

याचबरोबर गायरान जमीन प्रकरणावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची विरोधकांनी केलेली मागणी आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांबाबत मोठे बॉम्ब फोडण्याचा दिलेला सूचक इशारा, यानंतर काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर विधान भवन परिसरात आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. त्यांच्या वाती काढल्या आहेत, फक्त त्या पेटवण्याचा अवकाश असल्याचं केलेलं विधाना यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा – ‘बॉम्ब’ बरेच, फक्त वाती पेटवण्याचा अवकाश; उद्धव ठाकरे यांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कुठलही प्रकरण काढायचं त्यावर हंगामा करायचा आणि उत्तर घ्यायचं नाही. अशाप्रकारचा प्रयत्न दिसतोय. आतापर्यंततरी हे जे बॉम्ब, बॉम्ब म्हणताय ते लवंगी फटाकेदेखील नाहीत. आमच्याजवळ भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू पण आता सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत, ते आम्ही बघू.” असं फडणवीस म्हणाले.