scorecardresearch

विज्ञान काँग्रेस अन् हळदी कुंकवाचा काय संबंध? शहरातील पुरोगामी मान्यवरांचा सवाल

नागपुरात आयोजित १०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या तिसऱ्या दिवशी पार पडलेल्या महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन चक्क हळदी-कुंकवाने करण्यात आले. या प्रकाराला परराज्यातून आलेल्या काही महिला वैज्ञानिकांनी आक्षेप घेतला होता.

विज्ञान काँग्रेस अन् हळदी कुंकवाचा काय संबंध? शहरातील पुरोगामी मान्यवरांचा सवाल
महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन चक्क हळदी-कुंकवाने करण्यात आले.

महिला विज्ञान काँग्रेसला २४ तास उलटून गेले तरी हळदी-कुंकू आणि रांगोळीचा विषय चर्चेत आहे. या विषयावर महिलांसोबतच पुरुषांकडून देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

हेही वाचा- महिलांच्या जबाबदारीचे विभाजन व्हावे – डॉ. द्रिती बॅनर्जी

नागपुरात सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये कालचा दिवस महिला विज्ञान काँग्रेसचा होता. टीना अंबानी यांनी या परिषदेकडे पाठ फिरवली. मग संस्कार भारतीच्या कांचन गडकरी यांनी धुरा सांभाळली. संस्कार भारतीचा आणि विज्ञानाचा तसा काहीच संबंध नाही. यात त्यांनी देशभरातून आलेल्या महिला शास्त्रज्ञांचे हळदी कुंकू केले. सरकारी खर्चाने असे कार्यक्रम राबवायचे तर तिथे विज्ञान काँग्रेस कशाला, असा प्रश्न आकांक्षा प्रकाशनच्या अरुणा सबाने यांनी उपस्थित केला. दारापुढील रांगोळीमुळे दुष्ट शक्ती आत येत नाही, हे कल्पना पांडे यांचे वक्तव्य अत्यंत हास्यास्पद होते, असे त्या म्हणाल्या. एकीकडे हळदीकुंकू नवऱ्याच्या जीविताशी जोडले जात असताना आम्ही मात्र सौंभाग्यवतीसह इतरही महिलांना हळदीकुंकू लावून प्रबोधनाची सुरुवात केली आहे, अशी प्रतिक्रिया रेखा दंडिगे-घिया यांनी दिली.

हेही वाचा- चिंता नको, क्षयरोग नियंत्रणासाठी ‘बीसीजी’ लसींवर काम सुरू..! डॉ. शेखर मांडे यांची माहिती

नागपुरात एकूणच भारतीय विज्ञान काँग्रेसचा कारभार भोंगळ ठरला आहे. महिला विज्ञान काँग्रेसमध्ये घडलेल्या प्रकारानंतर त्याची खरोखरच दखल घ्यावी का, असा प्रश्न आहे. एकीकडे विज्ञानाच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे त्याच विज्ञानाच्या व्यासपीठावर प्रतिगामी परंपरा जपायच्या, याला काय म्हणायचे, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. विज्ञानाच्या आधारे महिलांचे सक्षमीकरणाची मांडणी करणे गरजेचे असताना अशाप्रकारे अवैज्ञानिक विचार मांडून मूळ कार्यक्रर्माच्या उद्देशाला गडकरी व पांडे या दोन महिलांनी मडा दिला आहे. रांगोळी काढणे, हळदी-कुंकू यांचा विज्ञानाशी संबंध जोडण्याची गरजच नाही. त्याचा फायदा होत असेल तर आपल्याला राफेल, अत्याधुनिक शस्त्रे, डीआरडीओ, विज्ञान काँग्रेसचीही गरजच उरणार नाही. ही विचारसरणी देशाच्या प्रगतीसाठी घातक असून देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अतुल लोंढे यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 13:22 IST

संबंधित बातम्या