अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात तब्बल ५० पदे रिक्त असून विस्तार मोठा असल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. त्यातच मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सद्यस्थितीत सहायक वनसंरक्षकाची दोन पदे, वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची दहा पदे, वनपालांची ७ आणि वनरक्षकांची ३१ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात वाईल्डलाईफ अवेअरनेस रिसर्च ॲन्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटी (वॉर) या संस्थेने वनमंत्र्यांना पत्र लिहून रिक्त पदे तातडीने भरण्याची आणि वनसंरक्षणाच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महत्वाच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

गेल्या तीन महिन्यांत वाघांच्या हल्ल्यात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. पण, वन्यजीवांचे संरक्षण हाही महत्वाचा विषय आहे. वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि हल्ले टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करणे. हा त्यावर अनेक उपायांपैकी एक उपाय होऊ शकतो. व्याघ्र प्रकल्पात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी एआय-आधारित कॅमेरे आणि सेन्सर बसवता येतात. ही उपकरणे वाघाची उपस्थिती शोधून वन विभाग आणि स्थानिक रहिवाशांना त्वरित अलर्ट पाठवू शकतात. यामुळे लोकांना आवश्यक खबरदारी घेता येईल आणि धोकादायक भागांपासून दूर राहता येईल, ज्यामुळे थेट संघर्ष टाळता येईल. जास्त धोका असलेल्या भागांमध्ये गस्त वाढवता येईल आणि गावातील लोकांना विशिष्ट धोकादायक क्षेत्रांबद्दल जागरूक करता येईल, असे पत्रात म्हटले आहे.

एआयचा उपयोग वाघांच्या पट्ट्यांच्या विशिष्ट नमुन्यांद्वारे प्रत्येक वाघाला ओळखण्यासाठीही करता येतो. हे तंत्रज्ञान वाघांची लोकसंख्या, स्थलांतर आणि त्यांचे एकूण आरोग्य यांचा मागोवा घेऊ शकते, ज्यामुळे संवर्धनासाठी महत्त्वाची माहिती मिळेल. यातून वन विभागाला वाघांची लोकसंख्या आणि त्यांच्या अधिवासाचे उत्तम व्यवस्थापन करण्यास मदत होईल.

अपुरे मनुष्यबळ

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे प्रकल्पाच्या कामांवर आणि पर्यावरणाच्या संरक्षणावर नकारात्मक परिणाम होत आहे. वनरक्षक, वनपाल, आणि इतर आवश्यक तांत्रिक कर्मचारी यांच्या अतिरिक्त पदांची निर्मिती करून ती तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. त्याचे गंभीर परिणाम समोर येत आहेत. अनेक लोक बांबूतोड करण्यासाठी संरक्षित भागात जातात, त्यातून मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवतो. हे सर्व रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. – निलेश कंचनपुरे, अध्यक्ष, ‘वॉर’ संस्था.