scorecardresearch

नवरा-बायको जंगलात तेंदूपत्ता तोडण्यात होते मग्न, तेवढ्यात दबा धरून बसलेल्या वाघाने केला हल्ला, अन्…

विकासच्या डोक्यावर वाघाने पंजाचा वार केल्याने शरीर रक्तबंबाळ झाले होते.

मंगळवारी सकाळी चिमूर तालुक्यातील केवाडा येथील जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका दांपत्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. मिना विकास जांभूळकर आणि विकास जांभूळकर असे त्या पती-पत्नीचे नाव आहे. या हल्ल्यात पत्नीला आपला जीव गमवावा लागला. तर जखमी पती बेपत्ता होता. अखेर आज घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावरील डोंगराळ परिसरात विकास गंभीर जखमी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारार्थ चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.

दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला

चिमूर तालुक्यातील केवाडा येथील विकास जांभूळकर हे पत्नी मिना यांचेसह तेंदूपत्ता तोडण्यासाठी गावापासून एक किमी अंतरावरील कक्ष क्रमांक ३४ मध्ये मंगळवारी सकाळी गेले होते. सोबतीला काही लोकही गेले होते. जंगलात गेल्यानंतर सगळे लोक तेंदूपत्ता तोडण्यासाठी विखूरले गेले. जांभूळकर दाम्पत्य एकमेकासोबत राहून पाने तोडत होते. शिवाय पतीला डोळ्याला अंधूक दिसत असल्याने ते एकमेकासोबत राहत होते. दरम्यान याच जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने या दोघांवर हल्ला केला.

पावसामुळे शोधमोहीम लांबणीवर

विकास आणि मीना दररोज साडेदहा वाजेपर्यंत तेंदूपत्ता तोडून घरी यायचे. परंतु काल साडे अकरा वाजेले तरी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे काही लोकांनी केवाडा जंगलातील कक्ष क्र . ३४ मध्ये शोधाशोध केली. त्यावेळी मीनाचा मृतदेह आढळून आला. तर घटनास्थळापासून ५० मीटरवर विकासचा चष्मा रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे विकासही कदाचित वाघाच्या हल्ल्यात ठार झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. वनविभाग व पिआरटी चमू व काही नागरिकांच्या मदतीने विकासची शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, संध्याकाळ झाली तरी विकासचा पत्ता लागला नाही. अखेर पाऊस सुरु झाल्याने शोधमोहीम थांबण्यात आली.

चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
बुधवारी पुन्हा शनेरी वनविभागाचे क्षेत्रसहायक रासेकर, वनरक्षक नागरे, पिआरटी चमू व स्थानिक नागरिकांनी के़वाडा जंगलात कक्ष क्रमांक ३४ मध्ये सकाळपासून शोधमोहीम राबविली. काल घडलेल्या घटनास्थळापासून तब्बल दिड किमी अंतरावर डोंगराळ परिसरात पिआरटी चमूचे विनोद चौधरी व सतीश बावणे यांना विकास बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. तपासणी केल्यानंतर तो जिवंत असल्याचे लक्षात आले. डोक्यावर वाघाने पंजाचा वार केल्याने शरीर रक्तबंबाळ झाले होते. सध्या त्याच्यावर चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wife killed and husband seriously injured in tiger attack in chimur nagpur dpj

ताज्या बातम्या