नागपूर : राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला आहे. पश्चिम महाराष्ट्रात मानव-बिबट संघर्ष तर विदर्भात मानव वाघ संघर्ष तीव्र झाला आहे. मात्र, या परिस्थितीत देखील काही ठिकाणी मानव-वन्यजीव सहअस्तित्व आहे. उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्यात मानव-वाघ सहअस्तित्वाचा हा क्षण वन्यजीव छायाचित्रकार हर्ष घाटे यांनी टिपला आहे.”जय” या वाघामुळे उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्याचे नाव जागतिक वन्यजीव पर्यटनाच्या नकाशावर कोरले गेले. तो गेल्यानंतर या अभयारण्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली. त्यानंतर “चांदी” नावाच्या वाघिणीमुळे पर्यटक पुन्हा येऊ लागले.
पर्यटक पुन्हा एकदा तेवढ्याच ओढीने या अभयारण्याकडे परत आले ते “फेअरी” या वाघिणीमुळे. या वाघिणीने पाच बचड्यांना जन्म दिला आणि तिला पाहण्यासाठी पर्यटकांसह सेलिब्रिटी या अभ्यारण्याकडे वळले. मात्र, “जय” सारखे हे अभयारण्य नावारूपाला आणले, या अभयारण्याला तेच जुने वैभव प्राप्त करून दिले ते “फेअरी” वाघिणीच्या अपत्याने. “एफ 2” ही वाघीण “फेअरी” या वाघिणीचेच अपत्य आणि तिनेही आपल्या आईचा वारसा पुढे नेत पाच बचड्यांना जन्म दिला.
उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्याला “एफ2” वाघीण व तिच्या पाच बचड्यांनी नव्याने ओळख मिळवून दिली. आज हे बछडे मोठे झाले तरीही त्यांना पाहण्याची ओढ पर्यटकांमध्ये अजूनही तेव्हढीच कायम आहे. हा कुटुंब गोठणगाव परिसरात बिणधास्तपणे फिरताना आढळून येतात. उमरेड-पवनी-कऱ्हाडला ला अभयारण्याचा दर्जा मिळण्यापूर्वी याठिकाणी मानव आणि वाघ यांचे सहअस्तित्व होते.
प्रेबेस नसल्यामुळे वाघांसाठी पाळीव जनावरे हीच त्यांची शिकार होती. मात्र, तरीही संघर्षाची परिस्थिती कधी उद्भवली नाही. मात्र, वाघांची संख्या पाहून याला अभयारण्याचा दर्जा देण्याचा निर्णय झाला तेव्हा गावकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतरही गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता याला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. किमान पर्यटन तरी लगेच सुरू करू नका ही गावकरी व वन्यजीव अभ्यासकांची मागणीही त्यावेळी फेटाळून लावली आणि पर्यटन सुरू करण्यात आले. “जय” हा वाघ सर्वात बलशाली अशी त्यावेळी त्याची प्रसिद्धी झाली, पण प्रत्यक्षात पाळीव जनावरांमुळे तो मोठा व अधिक वजनदार होता. इथले वाघ त्यावेळी शिकारीसाठी पाळीव जनावरांवर अवलंबून असले तरीही खूप मोठ्या संघर्षाची घटना कधी घडली नाही. वन्यजीव छायाचित्रकार हर्ष घाटे यांनी काढलेले हे छायाचित्र मानव-वाघ यांच्या सहस्तित्वाचे बोलके उदाहरण आहे.
