नागपूर : ते लहान होते तेव्हा त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत होती. एवढी की पर्यटकांची वाहने थेट त्यांच्याजवळ जाऊन पोहचायची. शेवटी त्यांच्या सुरक्षेसाठी वनखात्याने थेट या जिप्सी चालकांना आई गाईडला निलंबित करण्याचा निर्णय घेतला. हे पाचही बछडे आता मोठे झाले आहेत, पण त्यांना पाहण्याची ओढ अजूनही पर्यटकांमध्ये तेवढीच आहे. त्यांची “क्रेझ” अजूनही कायम आहे. उमरेड-कऱ्हाडला व्याघ्रप्रकल्पातील “एफ-२” वाघीण आणि तिच्या मोठ्या झालेल्या बचड्यांच्या करामती वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजीत मडावी यांनी टिपला आहे.
उमरेड-कऱ्हाडला व्याघ्रप्रकल्पाची ओळख वेगळी सांगायला नकोच. नागझिरा अभयारण्यातून आलेल्या “जय” या वाघाने या अभयारण्याला ओळख मिळवून दिली आणि जगभरातील व्याघ्रप्रेमींची पावले या अभ्यारण्याकडे वळली. अभिनेत्यांपासून तर क्रिकेटपटू अशी सर्वांची मांदियाळी या अभयारण्याने अनुभवली. “जय” च्या जाण्याने हे अभयारण्य ओसाड पडले, पण पुन्हा चांदी, फेअरी या वाघिणीणी या अभयारण्याचे लोप पावत चाललेले वैभव परत आणले. फेअरी या वाघिणीने पाच बचड्यांना जन्म दिला होता. त्यातलीच एक म्हणजे “एफ-२”. तिने देखील पाच बचड्यांना जन्म दिला असून हे कुटुंब उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यात चांगलीच धमाल करत आहेत.
त्यामुळे त्यांच्यासाठी या अभयारण्यात प्रचंड गर्दी होते आहे. तीन महिने अभयारण्य बंद असल्याने त्यांना आता बघता येणार नाही आणि तोवर ते पाचही बछडे बरेच मोठे झाले असणार. अभयारण्य बंद होण्यापूर्वीच त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
उमरेड-कऱ्हाड व्याघ्रप्रकल्प तीन महिने बंद असल्याने आता जंगल सफारी अनुभवता येणार नाही आणि तोवर "एफ-२" वाघीण आणि तिचे पाचही बछडे बरेच मोठे झाले असणार. "एफ-२" वाघीण आणि तिच्या बछड्यांच्या करामती वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजीत मडावी यांनी टिपल्या आहेत. अभयारण्य बंद होण्यापूर्वीचा… pic.twitter.com/HxhoYZhDaZ
— LoksattaLive (@LoksattaLive) July 11, 2025
निलंबन का ?
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ ‘एफ-२’ वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहेत. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ ते पर्यटकांना भुरळ घालत आहेत. त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी जंगल सफारीवर असलेल्या पर्यटकांच्या जिप्सीने समोरून व मागून घेरले होते. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात जिप्सीचे चार चालक व चार पर्यटक मार्गदर्शक यांना सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. तर जिप्सी चालकांवर अडीच हजार व गाईडला ४५० रुपये प्रति व्यक्ती दंड लावण्यात आला.
नियम काय होता ?
वाघापासून वाहने ३० मीटर दूर असणे गरजेचे आहे. पेंच, ताडोबा व अन्य व्याघ्र प्रकल्पासह अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची गती, वाहने कुठे थांबतात, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ॲप बनविण्यात आला आहे. जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर गुन्हा नोंदविला जातो. जंगलांमध्ये वाघाजवळून कुठलेही वाहन ३० मीटर दूर असले पाहिजे. वाघाच्या मागेपुढे वाहने उभी करणे हे चुकीचे आहे.