वर्धा : भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक व विचारवंत योगेंद्र यादव यांनी एका कार्यक्रमात बोलतांना संघटनेची भूमिका स्पष्ट केली. आज देश व संविधान वाचविण्याची गरज आहे. त्यासाठी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप सरकारला पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. आम्ही लढणार नाही पण कार्यकर्ते जोडून ताकद वाढवू. हीच ताकद भाजपला पराभूत करणार.सव्वा लाखाहून अधिक प्रशिक्षित स्वयंसेवक तयार आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात ते मोदी सरकारचा खोटेपणा उघडकीस आणतील. भारत जोडोत दीडशेहून अधिक संघटना एकत्र आल्या आहेत. पंधरा राज्यात संघटन मजबूत झाले आहे, असे यादव यांनी नमूद केले. मोदी सरकारच्या नारी वंदन विधेयकाचे स्वागतच. पण ते २०३८ पर्यंत लागू होणे शक्य नाही. त्यात तीन त्रुटी आहेत. २०२९ मध्ये लागू करण्याची हमी देण्यात आली. पण २०२३ मध्ये जनगणना आकडेवारी जाहीर होईल.त्यानंतर डी लिमिटेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागणार.आरक्षण कुणास मिळणार तसेच ओबीसी विषयी मौन आहे. रोटेशन कसे याबाबत स्पष्टता नाही. गांधींचा वारसा हडपण्याचा प्रयत्न गांधी हत्या करणारेच करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी सेवाग्राम आश्रमाचे प्रदीप खेलुरकर, अविनाश काकडे, कन्हैय्या छंगानी तसेच जोडो आंदोलनातील सुधीर पांगुळ, प्रवीण काटकर, मजीद कुरेशी, सुदाम पवार उपस्थित होते.