बुलढाणा : पहाटे साडेपाचची वेळ. मोताळा ग्रामीण रुग्णालयाचा दूरध्वनी खणखणला. तो उचलताच थेट पुणे मुख्यालयातून ‘‘शेलापूर आरोग्य उपकेंद्रात दाखल महिलेला असह्य प्रसव वेदना होत असल्याने तिला मोताळा ग्रामीण  रुग्णालयात दाखल करा,” असा संदेश मिळाला. १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर व चालक गरोदर मातेला गाडीत घेऊन  मोताळ्याकडे निघाले. पण, गरोदर मातेच्या वेदनांनी सीमा गाठली. रुग्णवाहिकेतील डॉक्टर या गरोदर महिलेसाठी देवदूतच ठरले. डॉक्‍टरांनी महिलेच्या नातेवाइकाच्या साक्षीने रुग्णवाहिकेतच तिची प्रसूती केली. महिलेने रुग्णवाहिकेतच गोंडस बाळाला जन्म दिला.

हेही वाचा >>> बुलढाणा : महसूल अधिकाऱ्यांचे आंदोलन स्थगित; मागणीला तत्वतः मान्यता, एप्रिलअखेर कार्यवाही

आज, गुरुवारी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर शेलापूर-मोताळा मार्गावरील चिंचपूर फाट्यावर जन्मास आलेले गोंडस बाळ व माता दोघेही सुखरूप आहेत. एखाद्या चित्रपटात शोभावी, अशीच ही घटना. मोताळा ग्रामीण रुग्णालयाच्या ‘१०८’ रुग्णवाहिकेचे  डॉ. शुभम डोंगरे व  चालक अंकुश वाघ यांनी गरोदर  मातेचा जीव वाचवला, असे म्हटल्यास ते अतिशयोक्ती ठरणार नाही. शितल आकाश बावणे, असे या महिलेचे नाव. माता व बाळ मोताळा रुग्णलयात उपचार घेत असून दोघांची प्रकृती ठणठणीत आहे. खेड्यापाड्यावरील गरोदर मातांसाठी १०८ रुग्णवाहिका ‘फिरते प्रसुतीगृह’च ठरत असल्याचे या घटनेवरून पुन्हा सिद्ध झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.