शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना मूल तालुक्यातील कांतापेठ येथे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. कल्पना अरुण लोनबले (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. मानव-वन्यजीव संघर्षात जिल्ह्यात आतापर्यंत ४१ जणांचे बळी गेले आहे.
कल्पना लोनबले सकाळी शेतामध्ये कापूस वेचण्याकरिता गेल्या होत्या. कापूस वेचणी करीत असताना दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवून जागीच ठार केले. यानंतर वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ५२३ मध्ये जवळपास शंभर मीटर अंतरावर ओढत नेले.
हेही वाचा >>>चंद्रपूर: तब्बल १७ वर्षानंतर भेट, कलावती बांदूरकर यांनी राहुल गांधींचे मानले आभार
माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे क्षेत्र सहाय्यक राकेश कुमरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. महिनाभरापूर्वी मूल तालुक्यातील चिरोली व चिचाळा येथील दोघांना वाघाने हल्ला करून जागीच ठार केले होते. या घटना ताज्या असताना कांतापेठ येथील घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतीची कामे कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. वाघांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.