कामे होत नसेल तर मतदान का करायचे, नागरिकांचा सवाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : महापौर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गुरुवारी महापौर नंदा जिचकार यांनी  प्रभाग ३३ व प्रभाग १४ मधील वस्त्यांचा दौरा केला. या दरम्यान समस्याग्रस्त महिलांनी महापौरांवर प्रश्नांचा भडिमार केला. प्रभागातील साधी विकास कोमे होत नसेल, समस्या सुटत नसेल तर आम्ही तुम्हाला मतदान का करायचे, असा थेट सवाल त्यांनी केला.

प्रभाग ३३ मध्ये महिलांनी नगरसेवकांवर नाराजी व्यक्त  केला. महापौरांचा दौरा आहे म्हणून महापालिकेला जाग आली अन्यथा नगरसेवक व अधिकारी येऊन पाहत नाही, अशा तक्रारी महिलांनी महापौरांकडे केली. धंतोली झोनअंतर्गत गणेशपेठ समाज भवन, राजाबाक्षा, रामबाग, कुकडे लेआउट, चंद्रमणीनगर, बालाजीनगर, त्रिशरण चौक, अरविंद-उज्ज्वल-विजयानंद सोसायटी आदी ठिकाणी महापौरांनी भेट  दिली. तेथे त्यांना लोकनाराजीचा सामना करावा लागला.

चंद्रमणीनगर परिसरात अनेक ठिकाणी गडर लाईन फुटली आहे. नळाचे पाणीही दूषित असून सफाई कर्मचारी नियमित येत नसल्याची तक्रार करत नगरसेवक फिरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रभाग ३३ मध्ये भाजपचे नगरसेवक असले तरी अस्वच्छतेचा कळस होता. आम्हाला मतदान केले नाही तर कामे कशी करणार, अशी भाषा नगरसेवक बोलतात अशी तक्रार महिलांनी केली.

महापालिकेच्या जाटतरोडी हिंदी प्राथमिक शाळेमध्ये भेट दिली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला पाटील हजर नव्हत्या. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश महापौरांनी दिले. कुकडे लेआऊट परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सम्राट अशोक वाचनालयाच्या शेजारी रस्त्यावर कचरा टाकला जातो. महापौर येणार असल्यामुळे सकाळी तेथील कचरा उचलण्यात आला. चंद्रमणीनगरजवळ असलेल्या महापालिकेच्या मैदानात तेथील एका नागरिकाने गाईचा गोठा तयार केला. या नागरिकांची परिसरात दहशत असल्यामुळे परिसरातील नागरिक बोलू शकत नाही. त्यामुळे मैदान मोकळे करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

 

 

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women ask many question to nagpur mayor in mayor at your doorsteps initiative
First published on: 11-01-2019 at 00:58 IST