पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना आपण स्वधर्म विसरत चाललो आहोत. महिलांनी मोकळे केस सोडू नये, असे आवाहन करवीरपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य नृसिंह सरस्वती महाराज यांनी केले.
शिवशक्तीपीठ सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय विश्व स्वधर्म संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला दत्ता महाराज जोशी, इस्कॉनचे अनंतशेष प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शंकराचार्य म्हणाले, महिलांनी मोकळे केस सोडणे ही आपली संस्कृती नाही. आपला धर्म वेदप्रणीत आहे. महिलांनी मोकळे केस सोडणे संहारक देवताचे लक्षण आहे. स्वधर्माचा विसर होत असताना आपण संस्कृती हरवत चाललो आहोत. कुठलीही पदवी विकत घेता येते. मात्र, विद्या विकत घेता येत नाही. स्वधर्मामध्ये कर्तव्याला महत्त्व आहे. मात्र, ते पाळले जात नाही. धर्माचा विचार करताना त्या पद्धतीने आचरण केले पाहिजे.
परमेश्वराने जो धर्म सांगितला आहे त्या धर्माचा स्वीकार करा. मात्र, आज धर्मसंस्थांवर अतिक्रमणे होऊ लागली आहेत. स्वधर्माचे पालन करताना संस्कार टिकवून ठेवणे गरजेचे आहे. कुठलीही जात किंवा पंथ म्हणजे धर्म नाही तर मनष्याचे आचरण म्हणजे धर्म आहे. त्यामुळे मनुष्याचे आचरण चांगले राहणे म्हणजे स्वधर्माचे पालन करण्यासारखे आहे, असेही शंकाराचार्य म्हणाले.
स्वधर्माचे पालन करताना महिलांनी केस मोकळे न सोडता छान वेणी घालणे आहे. आपला धर्म हा पतीव्रतेचा धर्म आहे. महिलांनी वेणी घालणे या मागे विज्ञान असून शास्त्र सुद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.