अकोला : जिल्ह्यात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष असते. या दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. अवैध दारू विक्री विरोधात कारवाईकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने शहरालगतच्या गुडधी गावातील महिलांनी रविवारी आक्रमक भूमिका घेतली. महिलांनी रौद्ररूप धारण करीत अवैध दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी धडक देऊन टीन-शेड व हातगाड्यांची तोडफोड केली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी दारूची अवैध विक्री होते. अवैध दारू विक्रीची दुकाने राजराेसपणे थाटण्यात आली आहेत. ढाबे, हॉटेलमध्ये देखील लपून-छपून दारू विक्री केली जाते. दारू विक्रीच्या अवैध व्यवसायामुळे तरुण पिढी देखील व्यसनाधिनतेकडे वळत आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर अनेकांना असाध्य आजाराने ग्रासले. अकोला शहरालगतच्या गुडधी गावात अवैध दारू विक्री केली जात असल्याने गावातील महिला त्रस्त झाल्या होत्या. गावात अनेक वेळा दारू बंदीची मागणी करण्यात आली.

मात्र, दारू बंदीला विरोध झाला. त्यामुळे ही बंदी होऊ शकली नाही. अवैध दारू विक्रीच्या त्रासाला कंटाळून अनेक वेळा महिलांनी तक्रारी सुद्धा केल्या. मात्र, त्याची दखल घेतल्या गेली नसल्याचा आरोप महिलांनी केला. अखेर आज दारू विक्री विरोधात महिला आक्रमक झाल्याचे चित्र बघायला मिळाले. गावातील महिलांनी एकत्र येत अवैध दारू विक्री विरोधात रोष व्यक्त करून थेट त्याचे स्थळ गाठले. महिलांनी तीव्र संताप व्यक्त करीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या घरातील दारू साठा नष्ट केला. गावात दारू विक्री होत असलेले टीन-शेड आणि हातगाड्यांची प्रचंड तोडफोड करण्यात आली. गावातील अवैध दारू विक्रीचे ठिकाण महिलांचे लक्ष्य होते. महिलांच्या आक्रमक पवित्र्यापुढे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले होते.

वारंवार तक्रार, मात्र त्याकडे दुर्लक्ष

सिव्हिल लाईन पोलिसांचे दारू विक्रीच्या प्रकाराकडे पूर्णत: दुर्लक्ष असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. गुडधी गावामध्ये सर्रासपणे अवैध दारू विक्री केली जाते. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने गावातील महिला आज आक्रमक झाल्याचे चित्र होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. महिलांना समजावण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. दारू विक्रेत्यांवर ठोस कारवाईच्या मागणी महिलांनी लावून धरली होती. या घटनेमुळे गुडधी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.