वर्धा, विदर्भात तान्हा पोळा सर्वत्र उत्साहात साजरा केल्या जात असतो. मोठ्या पोळ्याच्या आदल्या दिवशी बाल गोपाल साजरा करीत असलेला हा सण यावर्षी २३ ऑगस्टला येत आहे. प्रामुख्याने निम शहरी व ग्रामीण भागात या सणास चांगलाच उत्साह असतो. वर्धा जिल्ह्यात या सणास मोठी परंपरा आहे .सिंदी रेल्वे येथील तान्हा पोळा तर विदर्भात सुप्रसिद्ध आहे. त्यामुळे सिंदीची ओळख आता पोळा सिटी अशी झाली असून येथील मोठमोठे लाकडी नंदी बघण्यास चांगलीच गर्दी उसळते.
आता एक कारागीर सर्वात मोठा नंदी तयार करण्याच्या विक्रमास सज्ज झाले आहे. ७ फूट उंच व ८ फूट रुंद अश्या आकाराचा हा नंदी राहणार आहे. त्याची घडण आता अंतिम टप्प्यात आली असून तो येत्या पोळ्यास हजर होईल. आष्टी शहीद येथील रवींद्र मोकद्दम हे नंदी तयार करणाऱ्या कलावंताचे नाव आहे. गत एक महिन्यापासून ते एकटेच हा नंदी तयार करण्याच्या कार्यात मग्न आहेत. हा राज्यातील सर्वात मोठा लाकडी नंदी बैल राहणार असल्याचा दावा ते करतात. असे कां ? असा प्रश्न केल्यावर ते म्हणतात की आजवर मीच तीन मोठे नंदी तयार करून दिले आहेत. पुलगाव, अल्लीपूरप
व टाकळघाट नागपूर येथे ते विकल्या गेले. सात वर्षांपूर्वी २ लाख रुपयास तो नंदी विकल्या गेला. ९ – ९ – ९९ रोजी आलेल्या पोळ्यास सर्वात पहिला नंदी मी तयार करून दिला होता. त्या आकाराचे नंदी कुठेच नसल्याचे चर्चा झाली. सिंदीच्या प्रसिद्ध पोळ्यात पण मी केलेल्या आकारापेक्षा मोठा नंदी नव्हता. त्यामुळे आज तयार होत असलेला नंदी हाच सर्वात मोठा ठरणार, अशी खात्री मोकद्दम देतात.
नंदी तयार करण्याच्या कामास आज अखेरचा हात फिरणार. आता घसाई व नंतर पॉलिश होईल. आष्टीच्या तान्हा पोळ्यात तो मांडणार. पण त्यापूर्वी तो कुणी विकत घेण्यास तयार असल्यास मी विकू शकतो. त्याची किंमत ५ लाख रुपये ठेवली आहे. अशी माहिती नमूद करीत मोकद्दम सांगतात की माझा हा संकल्प होता. सर्वात मोठा नंदी तयार करण्याचा. अनेक वर्ष झाली लाकडी नंदी तयार केलाच नव्हता. म्हणून यावर्षी संकल्प पक्का केला. विकल्या गेलाच पाहिजे असा हट्ट नाही. राहील माझ्याच कडे.आतून पोकळ राहणार असल्याने मंदिराची दानपेटी म्हणून पण तो कामास येवू शकतो. कुणी हिम्मतबाज असेल तर नंदी विकत देणार, असे एक प्रकारे आव्हानच मोकद्दम यांनी सदर प्रतिनिधिशी बोलतांना केले. या साठी अस्सल सागाचे ८० हजार रुपयाचे लाकूड विकत घेण्यात आले. नंदी तयार झाल्यावर त्याचे वजन १४० किलोच्या दरम्यान राहणार. देखणा असा होणारा हा नंदी घेणार कां कुणी विकत ?