अकोला : मुंबई येथील आमदार निवासस्थानातील कँटिनमध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी कामगार, मजूर संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या राज्यात सर्वसामान्यांना एक न्याय व आमदारांना दुसरा न्याय आहे का?, आमदारांना कायदा लागू होत नाही का? असे संतप्त सवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहेत. या संदर्भात अकोला बिल्डिंग पेंटर्स, बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड चांगलेच चर्चेत आले आहेत. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासाच्या कँटिनमध्ये एका कर्मचाऱ्याला सर्वांसमोर बेदम मारहाण केल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात आता कामगार व मजुर संघटनांनी आमदार संजय गायकवाडांविरोधात रोष व्यक्त करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवडून दिले जाते. त्यांच्यामार्फत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा, लोकहिताचे निर्णय व्हावेत यासाठी त्यांनी विधिमंडळामध्ये सखोल चर्चा करून प्रश्न मार्गी लावावेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. या विरोधात आमदार संजय गायकवाड यांनी गुंडागर्दी करून आमदार निवासातील कँटिनमधील कामगाराला बेदम मारहाण केली. त्याची चित्रफित सर्वत्र प्रसारित झाली आहे. आमदारांचे हे गैरवर्तन सर्वसामान्य जनतेचा अपमान करणारे आहे.

मारामारी करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. सर्वसामान्यांनी या प्रकारे कृत्य केले तर पोलीस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करतात. तोच कायदा आमदारांनाही लागू होतो. आमदार संजय गायकवाड हे लोकप्रतिनिधी असूनही त्यांनी सार्वजनिक ठिकाण कामगाराला जबर मारहाण करण्याचे निंदनीय कृत्य केले. या प्रकरणात आ. गायकवाडांना तत्काळ अटक करण्याची मागणी संघटनेने केली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी कायदेशीर मार्गाने तक्रार करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी कायदा हातात घेऊन गुंड प्रवृत्तीचे वर्तन केले. ही मारहाण गरीब कामगाराला केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मस्ती चढलेल्या आमदारांना त्वरित अटक न केल्यास अकोला बिल्डिंग पेंटर्स, बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, पंचशील गजघाटे, प्रकाश तेलगोटे, निशिकांत सरदार, सागर नितनवरे, भास्कर सोनोने, अजिंक्य सूर्यवंशी, उद्धव ढिसाळे आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.